लॉक डाऊनच्या काळात दाताच्या समस्येने हैराण झालेल्या नागरिकांना बेळगाव आर सी नगर येथील डेंटिस्ट डॉ. स्नेहा गुरव (माचा) यांच्या स्वरूपात दिलासा मिळाला आहे. लॉक डाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नसल्यामुळे दंतवैद्य डॉ. स्नेहा गुरव यांनी फोनवरून दातांच्या समस्येवर मोफत उपाय सांगण्याबरोबरच वैद्यकीय सल्ला देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून देशातील बहुतांश डॉक्टरांनी कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत आपला व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि दातासंबंधीच्या तक्रारी असणाऱ्या नागरिकांची कुचंबना होऊ नये, त्यांची सोय व्हावी यासाठी राणी चन्नम्मा नगर येथील दंतवैद्य डॉ. स्नेहा गुरव या फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दाताच्या समस्या असणाऱ्या रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार करत आहेत. बेळगाव आणि परिसरातील नागरिकांसाठी त्यांनी हा उपक्रम नुकताच सुरू केला आहे. यामुळे दाताच्या समस्या असणाऱ्या अनेक जणांना दिलासा मिळाला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इंडियन डेंटल असोसिएशनच्या (आयडीए) सूचनेनुसार देशातील डेंटिस्टनी अर्थात दंतवैद्यांनी आपापले दवाखाने बंद ठेवले आहेत. परिणामी दाताच्या समस्या असणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून दाताच्या वेदनांनी त्यांना हैराण केले आहे. अशा कांही रुग्णांनी डॉ स्नेहा गुरव यांच्याकडे मदतीची याचना केली होती. तेंव्हा डॉ. स्नेहा यांनी यावर तात्काळ पर्याय शोधून काढत फोन व सोशल मीडियाच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार त्या सध्या आपल्या सेल्फोन वरून घरबसल्या रुग्णांना दातांच्या समस्येवरील उपाय सांगतात. त्याचप्रमाणे दाताच्या गंभीर समस्यांच्या बाबतीत रुग्णांना संबंधित दाताचा फोटो काढून आपल्या सेलफोनवर पाठवण्यास सांगतात आणि त्यानंतर समस्येचे निवारण कसे करायचे याबाबत मार्गदर्शन करतात. हे सर्वकाही करण्यासाठी डॉ. स्नेहा गुरव कोणतेही शुल्क आकारत नाहीत हे विशेष होय. स्नेहा या उद्योजक ए बी जी इंडस्ट्रीजचे मालक आप्पासाहेब गुरव यांच्या कन्या आहेत.
दोन व्यक्ती समोरासमोर निकट आल्यास कोरोना विषाणुचा संसर्ग होतो हे आता जगजाहीर आहे. खास करून तोंडातील थुंकी अथवा तुषारांमुळे हवेतून या प्राणघातक विषाणूचे संक्रमण होत असते.
दंत वैद्यकीय क्षेत्र तोंडाशी संबंधित आहे यामुळे कोरोनाचा सर्वाधिक धोका दंतवैद्य यांना असल्यामुळे देशातील डेंटिस्टना त्यांचे दवाखाने तूर्तास बंद ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. ज्यामुळे कोरोना विषाणू प्रादुर्भावाला आळा बसण्यास मदत होणार आहे. यासाठीच मी सेलफोनच्या माध्यमातून लॉक डाऊनमुळे घरी बसून असलेल्या त्रस्त दंत रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा उपक्रम राबवत आहे, असे स्नेहा गुरव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. दातांच्या समस्येसंदर्भात डॉ. स्नेहा गुरव यांचा सल्ला अथवा मार्गदर्शन हवे असल्यास इच्छुकांनी 9916024630 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.