संपूर्ण देश लॉक डाऊन परिस्थितीत घरी असताना देखील काहींच्या उचापती मात्र सुरूच आहेत. चोरी दरोडे यासारखे प्रकार काही प्रमाणात कमी झाले असले तरी जंगल परिसरात वृक्षांची तोड करून निसर्ग समतोल बिघडवण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यावर वनविभागाने नजर ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
कणबर्गी परिसरात वृक्षतोड करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील डोंगरावर असलेल्या जंगलात ही वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र ही वृक्षतोड कोणी केली व कशासाठी केली याचा तपास लावणे गरजेचे बनले आहे.
कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेली वृक्षतोड तोडण्यात येत आहे. या भागातील नागरिक ही वृक्षतोड करू लागल्याने जंगलाचा ऱ्हास होऊ लागला आहे. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा अशी संकल्पना राबविणारे प्रशासनाने जंगल तोड झालेल्याकडे मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पर्यावरणात बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करू लागले आहेत. नुकतीच लावण्यात आलेल्या वृक्षांची कत्तल करण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. तिकडे संपूर्ण देशात लॉक डाऊन असताना दुसरीकडे कणबर्गी परिसरातील नागरिक मात्र वृक्षतोडीच्या कामात असल्याचे दिसून येत आहेत. अशा नागरिकांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. वन विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन संबंधितावर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करावा आणि परत त्यांच्याकडूनच झाडे लावून घ्यावी अशी मागणी होत आहे.