लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील “फूड फाॅर नीडी” संघटनेतर्फे तिलारी मार्गावरील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या धामणे गवळीवाडा येथील गरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
“फूड फाॅर नीडी” संघटनेचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते सुरेन्द्र अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली आज रविवारी हा उपक्रम राबविण्यात आला. धामणे गवळीवाडा हे गाव 125 लोकसंख्येचे असून या गावापर्यंत जाणारा रस्ता देखील चांगला नाही. लॉक डाऊनमुळे शिनोळी आणि तुडये मार्ग बंद असल्यामुळे फूड फाॅर नीडीच्या टीमला या गावापर्यंत पोहोचण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. सर्व प्रमुख मार्ग बंद असल्यामुळे राकसकोप येथून एका शेतवाडीतून फूड फाॅर नीडीच्या टीमने धामणे गवळीवाडा हे गांव गाठले.
धामणे गवळीवाडा येथील लोकांना सुरेन्द्र अनगोळकर यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 10 दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. तिखट, मीठ, तूरडाळ, तेल, साखर, कांदे, लहान मुलांसाठी बिस्किटे आदींचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश आहे.
या जीवनावश्यक वस्तू दिल्याबद्दल धामणे गवळीवाडा येथील लोकांनी कृतज्ञता व्यक्त केली. सदर उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अनगोळकर यांच्यासह योगेश कलघटगी अमोल चोपडे आदींसह बेळगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. बेळगाव ते धामणे गवळीवाडा आणि पुन्हा बेळगाव अशा प्रवासा दरम्यान अडवणूक केली जाऊ नये यासाठी फूड फाॅर नीडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जाधव यांची मदत घेतली होती.