Sunday, November 24, 2024

/

‘पिकवणाऱ्याला कवडीमोल’ ‘विकणाऱ्याचा गल्ला फुल्ल’

 belgaum

अचानक पणे कोरोना संकट आले आणि सर्वांच्या रोजगाराचे , व्यवसाय धंद्याचे बारा वाजले आहेत. लॉकडाऊन मुळे घरातच बसणे अपरिहार्य बनले आहे. पण जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मात्र काहीअंशी सुरू आहे. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अश्या राष्ट्रीय आपत्तीमध्ये सुद्धा जगाची भूक भागवण्यासाठी या संकटावर मात करत भाजीपाला, फळे, दूध, धान्य पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याच्या या कष्टाचा मोबदला त्यांना कवडीमोल मिळत आहे. पण तोच माल लॉकडाऊनचा फायदा घेत व्यापारी चढ्या दराने विकून आपला गल्ला भरून घेत असल्याचे दिसून येत आहे.

शेतकरी मोठ्या कष्टाने पिकवून आणलेला माल थेट ग्राहकांना पोहचवणे शक्य नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देत आहे. पण तिथे आवक वाढली हे कारण पुढे करून भाजीपाल्याला अगदी किरकोळ दर दिला जातो. पण तोच भाजीपाला शहरात आणि ग्रामीण भागात विक्रीसाठी गेला की त्यासाठी अव्वाच्या सव्वा दर आकरला जात आहे. यामुळे व्यापारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तसाच काहीसा प्रकार किराणा सामान विकणारे दुकानदार सुद्धा करत आहेत. 70-80 रुपये प्रती किलो असलेल्या डाळी कडधान्य लॉकडाऊन काळात एकदम 120-130 दराने तसेच 80 ते 90 रुपये असलेले खाद्यतेल 120 ते 140रुपये किलो चढ्या दराने विक्री होत आहेत. वेळेचे बंधन आणि पुरवठ्या मध्ये अडचणीची सबब पुढे करून ग्राहकांच्या गरजेचा फायदा उठवला जात आहे. अशा दुकानदारावर करावाइ करण्याची गरज व्यक्त होत आहे.

दुग्ध व्यवसायात सुद्धा आंतरराज्य दुग्ध वाहतूक बंद असल्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे. दुधाची उचल न करणे, दर कमी आकारने असे प्रकार घडत आहेत. तेच शहरी भागात सिलडाऊनच्या वेळी दूध सुद्धा मिळणे मुश्किल बनले आहे. मग तेव्हा सुद्धा पांढऱ्या दुधाचा काळा बाजार मांडला जातोय. यावरून असे दिसते की काळाबाजार, साठेबाजी, दरवाढ यामुळे गरीब शेतकऱ्याची तर होरपळ होतंच आहे. शिवाय सर्वसामान्य जनतेला सुद्धा महागाईला सामोरे जावे लागत आहे. याचा विचार होण्याची गरज आहे.

प्रशासनाने शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमीभाव द्यावा अतिरिक्त मालाची उचल करावी, किराणा मालाचे आठवडी दरपत्रक जाहीर करावे आणि साठेबाजी व काळ्याबाजाराला आळा आणण्यासाठी सक्तीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.