बेळगाव जिल्ह्यातील कोरोना संशयित आणि कोरोना बाधित रुग्णांना संदर्भातील खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्ध केल्या जात आहेत. यावर पर्याय म्हणून बीम्स हॉस्पिटलमध्ये यापुढे फक्त कोरोना बाधित रुग्णांना दाखल करून घेऊन त्यांचे विलगीकरण अर्थात आयसोलेशन केले जाईल, असे बीम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
जिल्ह्यातील कोरोना संशयित आणि कोरोना बाधित रुग्णांना एकत्र ठेवले जात असल्याचे वृत्त विविध टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित केले जात आहे. यासाठी काॅरन्टाईन असलेले रुग्ण खिडकीतून दुसऱ्या बाजूला असलेल्या तिघा संशयितांना आम्हाला कोरोना बाधित रुग्णांसमवेत ठेवले जात आहे, असे सांगतानाचा व्हिडीओ दाखविला जात आहे. दिल्ली येथील तबलीग जमातीच्या धर्म सभेला उपस्थित राहून आलेल्या 36 कोरोना संशयित रुग्णांना गेल्या 31 मार्च 2020 रोजी दुपारी बीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
या सर्वांचे स्वॅबचे नमुने 1 एप्रिल 2020 रोजी घेण्यात आले आणि संबंधित रुग्णांना काॅरन्टाईन करून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी शिमोगा येथील व्हीआरडीएल लॅबला पाठविण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल 3 एप्रिलला मिळाला त्यामध्ये 33 पैकी तिघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांचे वेगवेगळे आयसोलेशन करण्यात आले. त्याचप्रमाणे उर्वरित रुग्णांना डिसचार्ज देऊन त्यांची रवानगी हॉस्पिटलबाहेर जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या काॅरन्टाईन विभागात करण्यात आली. संबंधित ठिकाणी ते रुग्ण काॅरन्टाईनचा कालावधी संपेपर्यंत राहणार आहेत.
तो वादग्रस्त व्हिडीओ संशयित रुग्णांपैकी एकाने घेतला आहे. काॅरन्टाईन रुग्णांना कोरोना बाधित रुग्णांना पासून वेगळे करण्यात आले त्यावेळी सदर व्हिडिओ प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आला असावा. कोरोना बाधित रुग्ण हॉस्पिटलमध्ये मुक्तपणे वावरत आहेत असे जे वृत्त प्रसिद्ध झाले आहे ते निखालस खोटे आहे. उलटे कोरोना बाधित रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये एकमेकांपासून अलग ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती उत्तम असून त्यांना सतत निरीक्षणाखाली ठेवले जात आहे. हॉस्पिटलमधील स्वच्छता आणि खबरदारीच्या उपायांबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाने प्रत्यक्ष रुग्णांची भेट घेऊन त्यांना समजावले आहे. आता यापुढे जिल्हा प्रशासनाकडून काॅरन्टाईन असलेल्या रुग्णांसाठी हॉस्पिटल बाहेर जी व्यवस्था केली आहे त्या ठिकाणीच काॅरन्टाईन रुग्णांना ठेवण्यात येऊन त्यांच्यावर उपचार केले जातील. तसेच संशयित रुग्णांचे नमुने देखील त्या काॅरन्टाईन विभागाकडूनच घेतले जातील. त्यानंतर फक्त कोरोना बाधित रुग्णांनाच बीम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले जाईल तसेच त्यांचे आयसोलेशनहि केले जाईल, असे बीम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी प्रसिद्धी पत्रामध्ये नमुद केले आहे.