जगभर कोरोना थैमान घालत आहे. जणू सगळी सृष्टी ठप्प झाली आहे, आणि कोरोना एकटाच राज्य करतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसं घरात अडकून पडलेत, उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.
भयंकर महामारीशी झुंज देताना प्रशासनासह नागरिक मेटाकुटीला आले आहेत. कोरोनाचा कहर दिवसेंदिवस बळावत चालला आहे.रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. वैद्यकीय साधने अपुरी पडत आहेत. अश्या वेळी पाटील गल्ली वडगांव येथील लहानश्या साध्या उद्योजकाने लघुउद्योगाच्या माध्यमातून क्रांतिकारी उत्पादनाला सुरुवात केली आहे.

कोरोना बाधित रुग्णांचा उपचार करणाऱ्या डॉक्टर व नर्सच्या सूरक्षेचा विचार करत टी डी ग्रुप या संस्थेने पर्सनल प्रोटेकशन किट बनवण्यात यशस्विता मिळवली आहे.अश्या पद्धतीचे विविध कंपन्यांचे किट उपलब्ध आहेत परंतु रिसायकलिंग होणारे हे एकमेव किट आहे सुमारे महिनाभर चारवेळा धुऊन हे किट तितक्याच सुरक्षिततेने वापरता येते. या किटची माहिती जस जशी प्रसार माध्यमातून वैद्यकीय क्षेत्राला पोहोचत आहे तसतशी त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात किटची मागणी होत आहे.
नुकतेच रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी व जिल्हा पंचायत सी ई ओ के व्ही राजेंद्र, जिल्हा आरोग्यअधिकारी यांनी या युनिटला भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले आणि प्रोत्साहन म्हणून बेळगावातील डॉक्टरांचे किट बनवण्याचे ऑर्डर दिली.पाटील गल्ली वडगांव मधील या छोट्याश्या लघु उद्योजकाने उत्तम दर्जाचे किट तयार करून बेळगावचे नांव कर्नाटक राज्यात उज्वल केले आहे.