लॉक डाऊनमुळे सर्वसामान्य गरीब गरजू लोकांचे पोटापाण्याचे हाल होऊ नयेत म्हणून अनेक मंडळी अन्नदान व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करून प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत. तथापी बेळगावातील असे एक व्यक्तिमत्त्व आहे की जे सर्वांना सुपरिचित असूनदेखील याबाबतीत अद्यापही प्रसिद्धीपासून दूर आहे. दलित नेते व सामाजिक कार्यकर्ते मल्लेश गोपाळराव चौगुले हे ते व्यक्तिमत्व होय. सध्या ते अनेकांचा आधार बनले आहेत
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले, त्यांची पत्नी गौरी चौगुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असहाय्य गोरगरीब आणि गरजूंची सेवा करण्याचा जणू विडाच उचलला आहे. मल्लेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी कुमारस्वामी लेआउट, रामतीर्थनगर, विजयनगर आणि हनुमाननगर परिसरातील अद्याप दुर्लक्षित असलेल्या गोरगरीब कुटुंबांसह वयोवृद्ध कुटुंब, निराधार महिला, जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना धान्य जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला आणि औषधांचे वाटप केले.
दलित नेते मल्लेश चौगुले आणि त्यांची पत्नी गौरी चौगुले यांनी लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून आजतागायत अगणित गरीब गरजु कुटुंबांसह निराधार महिला, जेष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि अनाथालयांना जीवनावश्यक साहित्य, भाजीपाला, औषधे आदींचे वाटप केलेले आहे. याकामी चौगुले दांपत्याला मल्लेश याची लहान बहीण प्रभा चौगुले, मुलगी अश्विनी राघवेंद्र मेत्री, जावई राघवेंद्र गणपत मेत्री, विनोद सोलापुरे, सुधीर चौगुले, आनंद कांबळे, रामानंद मेत्री, सुनील कांबळे, शिवपुत्र मेत्री, दीपक चौगुले, कृष्णा आदींसह बेळगावातील ऑल इंडिया दलित युथ ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत आहे.
कांही दिवसापूर्वी जर्मनीत शिक्षणास असलेल्या आपल्या मुलीच्या विनंती वरून मल्लेश चौगुले यांनी लाखो रुपये खर्च करून जर्मनीत शिकणाऱ्या भारतीय मुलांसाठी औषधे, मास्क आदींची मदत देऊ केली आहे. पदरमोड करून जीवनावश्यक वस्तू आणि औषधे आणून मल्लेश चौगुले शहरातील गरजूंसाठी उपरोक्त उपक्रम राबवत आहेत. त्याचप्रमाणे सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात आपल्या पतीच्या समाजकार्याला हातभार लावताना गौरी चौगुले या रात्रभर जागून जीवनावश्यक वस्तूंची पाकिटे तयार करत असतात, हे विशेष होय.