बेळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून हिरेबागेवाडी येथे शनिवारी आणखी एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 42 झाली आहे. पी – 128 या हिरेबागेवाडी येथील कोरोना बाधित रुग्णापासून संसर्ग झाल्याने सदर 45 वर्षीय व्यक्ती कोरोनाग्रस्त बनल्याचे उघडकीस आले आहे. शनिवारी आढळून आलेल्या या रुग्णामुळे राज्यातील कोरोना बाधीतांची संख्या देखील वाढली असून तिने 370 चा टप्पा पार केला आहे.
कर्नाटक राज्य सरकारकडून शनिवारी दुपारी प्रसिद्धीस दिलेल्या मिड-डे मेडिकल बुलेटीनद्वारे हिरेबागेवाडी येथील आणखी एका 45 वर्षीय इसमाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे जाहीर करण्यात आले असून त्याला पी – 364 हा क्रमांक देण्यात आला आहे. सदर रुग्णाला पी -128 या रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 42 झाली आहे.
दरम्यान, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये 12 रुग्णांची नव्याने भर पडल्यामुळे शनिवारी राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 371 झाली आहे. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला असून 92 जणांना डिसचार्ज देण्यात आला आहे. राज्यामध्ये काल शुक्रवार 17 एप्रिल दुपारपासून आज शनिवार एप्रिल दुपारी 12 वाजेपर्यंत म्हैसूर येथे 3 कलबुर्गी व बागलकोट येथे प्रत्येकी 2 आणि हिरेबागेवाडी बेळगावसह विजयपुरा, हुबळी -धारवाड, गदग व मंड्या येथे प्रत्येकी 1 कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे.