Monday, November 18, 2024

/

जेएनएमसी” प्रयोगशाळेसाठी लाॅक डाऊनचा अडथळा

 belgaum

आयसीएमआरने अर्जासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना केएलई ॲकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजने कोव्हीड -19 अर्थात कोरोना तपासणी सुविधा स्थापित करण्यासाठी अर्ज केला आहे. तथापि लॉक डाऊनमुळे अद्याप एनएबीएलची मान्यता मिळणे बाकी असल्याने जीएनएमसी प्रयोगशाळा स्थापनेत अडथळा निर्माण झाला आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोव्हीड -19 तपासणी सुविधा स्थापण्यासाठी देशातील सर्व सरकारी आणि खाजगी मेडिकल कॉलेजीसकडून अर्ज मागविले आहेत. कोव्हीड -19 अर्थात कोरोना या श्वसन व्यवस्थेशी संबंधित विषाणूची तपासणी सुविधा स्थापण्यासाठी जे. एन. मेडिकल कॉलेजने अर्ज केला असला तरी त्यांना त्यासाठी एनएबीएलचे मान्यता पत्र दाखल करावे लागणार आहे.

तथापि लाॅक डाऊनमुळे बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लेबोरेटरीजची (एनएबीएल) मान्यता मिळवण्यात सध्या जेएनएमसी असमर्थ ठरले आहे. बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 10 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या जिल्ह्यात आढळून येणाऱ्या सर्व संशयित रुग्णांचे नमुने कोरोना तपासणीसाठी बेंगलोर किंवा शिमोगा येथे पाठविले जात आहेत. हुबळी हॉस्पिटलमधील प्रयोगशाळा नुकतीच सुरू झाली असून बेळगावची प्रयोगशाळा अद्याप सुरू व्हावयाची आहे.

सध्या एनएबीएलचे अधिकारी आमचे फोन कॉल्स स्वीकारत नसल्यामुळे अडचण निर्माण झाली असल्याचे जे. एन. मेडिकल कॉलेजशी संलग्न असणाऱ्या डाॅ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. वाली यांनी सांगितले. एनएबीएलच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला ऑनलाइन मान्यता मिळू शकते असे प्रथम सांगितले होते तथापि त्यानंतर त्यांनी व्हिडिओ कौन्सिलिंग कॉन्फरन्सिंगद्वारे मशीनचे निरीक्षण केले जाईल असे सांगितले. पुढे आणखी एक कलम जोडताना एच 1 एन 1 सारख्या संसर्गजन्य श्वसन रोगांचे निदान किती प्रभावीरीत्या होते हे प्रत्यक्ष पाहिल्याखेरीज आम्ही मान्यता देऊ शकत नाही असे स्पष्ट केले आहे. सध्या आरटी – पीसीआर मशीन गेल्या दहा दिवसांपासून आमच्याकडे पडून आहे. मान्यतेसंदर्भात एनएबीएलच्या अधिकाऱ्यांनी आमच्या शी बोलावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, असेही डॉ. वाली यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.