खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टी गावानजीक रस्त्याशेजारी दोन ठिकाणी 500 रुपयांच्या नोटा संशयास्पदरीत्या टाकण्यात आल्याचे शनिवारी सकाळी आढळून आल्यामुळे भीतीयुक्त तर्कवितर्क केले जात आहेत.
खानापूर तालुक्यातील जांबोटी गावांनजीक असलेले हब्बनहट्टी हे छोटे गाव त्याठिकाणी असलेल्या श्री मारुती देवस्थानासाठी सुप्रसिद्ध आहे. या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी ठराविक अंतरावर 500 रुपयांच्या दोन नोटा जाणून-बुजून ठेवण्यात आल्याचे शनिवारी सकाळी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले.
कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात कांही ठिकाणी समाजकंटकांकडून कोरोनाचा फैलाव करण्यासाठी नोटांना थुंकी लावून त्या रस्त्यावर टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. हब्बनहट्टी तेथील रस्त्यावर टाकण्यात आलेल्या बेवारस नोटा या अशाच पद्धतीच्या असाव्यात या संशयाने नागरिकांनी लागलीच पोलिसांना त्याबाबत माहिती दिली.
सदर माहिती मिळताच पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. तसेच रस्त्यावर टाकलेल्या 500 रुपयाच्या त्या दोन संशयास्पद नोटा सॅनेटाईझ अर्थात निर्जंतुक करून ताब्यात घेतल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान हब्बनहट्टी रस्त्यावर बेवारस नोटा सापडण्याच्या या प्रकाराबद्दल तर्कवितर्क केले जात असून तालुक्यात सध्या या पाचशेच्या नोटा चर्चेचा विषय बनल्या आहेत.