तीन दिवसांनी बेळगावात कोरोना पोजीटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला असून 42 वरून हा आकडा 43 ला पोहोचला आहे.संकेश्वर येथील महिलेला कोरोनाची बाधा झाली असल्याचे राज्य मेडिकल बुलेटिन मध्ये सांगण्यात आले आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सलग तीन दिवस 42 इतकी स्थिर राहिल्यानंतर आज मंगळवारी त्यामध्ये एकाची वाढ झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात काल सोमवार दि 20 एप्रिल सायंकाळपासून मंगळवार दि. 21 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत एक नवा कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 43 झाली आहे.
गेल्या बारा तासात बेळगाव जिल्ह्यात आणखीन एका कोरोना बाधित रुग्णाची भर पडल्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या देखील वाढली असून ती आता 418 इतकी झाली आहे. गेल्या तीन दिवसानंतर बेळगाव जिल्ह्यात आढळून आलेला रुग्ण ही 20 वर्षीय महिला असून पी – 293 क्रमांकाच्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. चिकोडी(संकेश्वर) येथील पी – 293 क्रमांकाचा रुग्ण 43 वर्षीय इसम आहे. हा इसम नवी दिल्ली येथील तबलीग मरकज धर्मसभेला उपस्थित राहून गावी परतला होता. गेल्या तीन दिवसात एकही रुग्ण सापडला नसल्यामुळे तिला प्रशासनाला दिलासा मिळाला होता आणि लोकांमधील भीतीचे वातावरण ही निवळले होते. तथापि आता पुन्हा एक महिला कोरोना बाधित आढळून आल्यामुळे प्रशासनावरील दडपण वाढले आहे.