देशव्यापी लोक डाऊन मुळे मनुष्याप्रमाणे मुख्य प्राण्यांचे पोटापाण्याचे हाल होत आहेत सद्यस्थितीत खास करून मोकाट कुत्र्यांची परवड होत आहे. तथापि व्हॅक्सीन डेपो परिसरातील मोकाट कुत्र्यांना देशपांडे दांपत्याच्या स्वरूपात अन्नदाता मिळाला आहे.
टिळकवाडीच्या बुधवार पेठेतील सुप्रसिद्ध उद्योजक सुनील देशपांडे आणि त्यांची पत्नी मीना देशपांडे या उभयतांनी सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात व्हॅक्सिन डेपो परिसरातील मोकाट कुत्री उपाशी राहणार नाही याची काळजी घेण्याचा जणू विडा उचलला आहे. यासाठी देशपांडे दाम्पत्य दररोज व्हॅक्सिन डेपोत फिरायला जाताना पुरेसे अन्न सोबत घेऊन जातात. डेपो भागात सुमारे 20 हून अधिक मोकाट कुत्री असून त्यापैकी बहुतांश लहान पिल्ले आहेत. या सर्वांना देशपांडे दाम्पत्य खायला अन्न देण्याबरोबरच पिण्यास पाणीही देतात.
घराघरातून टाकले जाणारे तसेच हॉटेल, रेस्टॉरंट अथवा रस्त्या शेजारील खाद्याच्या गाड्यांमधून टाकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थ व अन्नावर मोकाट कुत्र्यांची पोटापाण्याची व्यवस्था होत असते. तथापि सध्या लॉक डाऊनमुळे सर्वकांही बंद आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील कुत्री अथवा अन्य मोकाट प्राणी टाकाऊ भाजीपाला आणि अन्नावर अवलंबून असतात. व्हॅक्सिन डेपो येथे हॉटेल, रेस्टॉरंट वगैरे कांहीही नसल्यामुळे येथील मोकाट कुत्र्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. येथील मोकाट कुत्र्यांना पशूप्रेमी नागरिकांनाकडून दिल्या जाणाऱ्या अन्नावर अवलंबून राहावे लागते.
तथापि आता लाॅक डाऊनमुळे लोकांनी व्हॅक्सिन डेपोमध्ये फिरावयास जाणे बंद केल्यामुळे कुत्र्यांचा अन्न मिळण्याचा हा मार्ग देखील खुंटला आहे. यासाठीच किमान लॉक डाऊनच्या काळात तरी आम्ही व्हॅक्सिन डेपो येथील मोकाट कुत्र्यांना अन्नपाणी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुनील देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. व्हॅक्सिन डेपो परिसरातील मोकाट कुत्र्यांचे तात्पूरते पालकत्व पत्करणार्या सुनील व मीना या देशपांडे दाम्पत्याची पशु प्रेमींकडून प्रशंसा होत आहे.