Friday, January 10, 2025

/

‘यांना’ कोरोनाची नाही तर, आहे पोटाची खळगी भरण्याची चिंता

 belgaum

कोरोना येऊ दे अथवा जाऊदे त्यांना त्याची काळजी नाही. कायम रोगराईला निमंत्रण देणाऱ्या वातावरणात राहणाऱ्या या सर्वांना चिंता आहे ती स्वतःच्या पोटाची. ही व्यथा आहे कॅम्प फिश मार्केट येथे एका बाजूला घाण केरकचऱ्याचा ढीग आणि दुसऱ्या बाजूला गळके अस्वच्छ स्वच्छतागृह (मुतारी) असलेल्या गेली 16 वर्षे वडाच्या झाडाखाली राहणाऱ्या 15 लोकांची.

सध्या संपूर्ण जग कोव्हीड – 19 अर्थात कोरोना विषाणूच्या दहशतीखाली असताना विविध चार कुटुंबातील या 15 लोकांना त्याची काहीही चिंता नाही. कोरोना त्यांच्यासाठी तितकासा काळजीचा विषय नाही. ते मास्क वापरत नाहीत कारण मुळात एका बाजूला कचरा आणि दुसऱ्या बाजूला मुतारी अशा अत्यंत अस्वच्छ वातावरणात राहून सवय झालेल्या या लोकांकडे दमडीही नाही. सध्याच्या परिस्थितीत पोटाची खळगी कशी भरायची ही एकच चिंता त्यांना लागून राहिलेली आहे. सध्या संबंधित सर्व 15 जण बेरोजगार असून सुवर्णा लोखंडे या एकमेव कमवत्या महिलेवर सर्वजण अवलंबून आहेत. तथापि सुवर्णाचा पगार हा तुटपुंजा गरजेपेक्षा फार कमी असल्यामुळे 15 जणांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी तिला काही सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी लागत आहे.

Serview family
Serview family camp corona doesnt matter

आम्ही 15 जण म्हणजे एक एकत्र कुटुंबच असून वयोवृद्ध गंगुबाई शेट्टू लोखंडे या आमच्या प्रमुख आहेत. आम्हाला 15 जणांमध्ये गंगुबाई यांचे जावई पंचा हंशेट आणि दादा फिर जालिगर यांचाही समावेश आहे. आमच्या 15 जणांच्या कुटुंबातील बहुतांश पुरुष मंडळी कूली काम आणि महिला रोजंदारी कामगार म्हणून काम करतात मी स्वतः कॅम्प येथील उद्योजक कादीम बेपारी यांचेकडे कामवाली म्हणून मासिक पगारावर काम करते, अशी माहिती सुवर्णा लोखंडे यांनी दिली. लॉक डाऊनमुळे सर्वजण बेरोजगार झाल्यामुळे सध्या आम्ही बिकट परिस्थिती सापडलो असून एकमेकांना आधार देत कसेबसे दिवस काढत आहोत. आम्ही इतक्या अस्वच्छ ठिकाणी राहतो कि आम्हाला रोगराईची चिंता नाही, चिंता आहे ती रोजच्या खाण्यापिण्याची, असे सुवर्णा लोखंडे यांनी कळवळून सांगितले.

उपरोक्त सर्वजण रात्री वडाच्या झाडाखालीच झोपतात, पावसाळ्यात पावसापासून रक्षणासाठी ते तात्पुरते शेड उभारतात. अस्वच्छ वातावरणात गेली 16 वर्षे वडाच्या झाडाखाली राहणाऱ्या या 15 जणांच्या एकत्र कुटुंबातील महिला नजीकच नादुरुस्त अवस्थेत पडून असलेल्या पाण्याच्या टँकरमध्ये जाऊन आपले कपडे बदलता. सदर टँकरच्या खालच्या बाजूला एक मोठे छिद्र असून त्यातुन या महिला ये-जा करतात. तसेच आपले जे काही साहित्य आहे ते त्या टँकरमध्येच ठेवतात. या महिलांसाठी तू टॅंकर म्हणजे कपडे बदलण्याची आणि साहित्य ठेवण्याची खोली आहे. उपरोक्त सर्वांचे आंघोळ व इतर विधी नजीकच्या स्वच्छतागृहात पार पडतात. यासाठी त्यांना घाण केरकचरा तुडवत ये-जा करावी लागते. अतिशय बकाल ठिकाणी राहणार्‍या या सर्वांना कोरोना सारख्या जीवघेण्या रोगाचीही अजिबात चिंता नाही, त्यांना चिंता आहे ती फक्त आपल्या रिकाम्या पोटाची.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.