Sunday, November 24, 2024

/

शहरात पारंपारिक पद्धतीने श्री शिवजयंती साजरी : मध्यवर्तीतर्फे शिवरायांना अभिवादन

 belgaum

शहर आणि परिसरात घराघरांमध्ये शनिवारी श्री शिवजयंती उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे बेळगाव मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे श्री शिवजयंतीनिमित्त शनिवारी सकाळी परंपरेनुसार एसपीएम रोड येथील शिवाजी उद्यानातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधीवत पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे यंदाचा शिवजयंती उत्सव साधेपणाने घरोघरी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुषंगाने बेळगाव मध्यवर्ती व शहापूर विभाग शिवजयंती उत्सव मंडळातर्फे शनिवारी सकाळी एस पी एम रोड येथील शिवाजी उद्यानातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परंपरेनुसार विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी शिवरायांची आरती म्हणून त्यांचा जय जय कार केला. सदर कार्यक्रमास बेळगाव मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, नेताजी जाधव, विकास कलघटगी मदन बामणे,रणजित चव्हाण पाटील गणेश दड्डीकर आदींसह मध्यवर्ती व शहापूर शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Shivjayanti
Shivjayanti

कोरोना रोगराईमुळे सध्या अनेक बंधने असतानादेखील श्री शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन विशेषकरून पोलिस प्रशासनाने आम्हाला आज छ. शिवाजी महाराजांची पारंपरिक पूजा व अभिवादन करण्यास परवानगी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे दीपक दळवी यांनी पूजा विधी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. कोरोना मुळे यंदाची शिवजयंती सालाबाद प्रमाणे उत्साहात साजरी करता येणार नसल्याने अनेक शिवजयंती उत्सव मंडळांचा हिरमोड झाला आहे. तथापि त्यांनी समंजसपणे परिस्थितीचा स्वीकार केला आहे. देशासमोर देशसेवेत समोर आणि जनतेच्या आरोग्य समुह आपल्या वैयक्तिक व सामूहिक उत्साहाला आवर घातल्याबद्दल आम्हीच सर्व शिवजयंती उत्सव मंडळांचे आभारी आहोत. शिवजयंतीनंतर तीन दिवसांनी काढण्यात येणारे चित्ररथ मिरवणूक यंदा काढता येणार नाही ही खंत असली तरी सध्या कोरोना विषाणूच्या संकटावर मात करणे सर्वाधिक गरजेचे आहे, असेही बेळगाव मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यंदा लोक डाऊन असल्यामुळे शिवजयंती उत्सवावर मर्यादा आली असली तरी आज शनिवार शहर आणि परिसरात अनेकांनी आपापल्या घरी शिवजयंती उत्साहात साजरी केली. यावेळी प्रत्येकाने आपल्या घरासमोर भगवे ध्वज लावले होते. यंदा शिवजयंती उत्सवावर मर्यादा असली तरी शिवप्रेमींचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला दिसत नव्हता. दरवर्षी शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांवरून शिवज्योत आणण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने रवाना होतात, परंतु यंदा कार्यकर्त्यांना शिवज्योत आणता आली नाही. त्यामुळे कार्यकर्ते कांही प्रमाणात नाराज झाले आहेत. एकंदर लॉक डाऊन काळातही शिवजयंतीनिमित्त शहरवासीयांमध्ये उत्साह पहावयास मिळत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.