कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर नेहरूनगर येथील गायकवाड चाळीतील भाडेकरूंनी आपला वहिवाटीचा रस्ता खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी झाडाच्या फांद्या वगैरे टाकून बंद केला. यावरून बेळगावकरांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे शासनाचे आवाहन किती गांभीर्याने घेतले आहे ते स्पष्ट होते. तसेच दुकाने,रस्ते वगैरे बंद करण्याचे लोण आता चाळीपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.
कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि घ्यावयाची खबरदारी यासंदर्भात जिल्हा प्रशासन व आरोग्य खात्याकडून सातत्याने जनजागृती केली जात आहे. त्याचप्रमाणे कोरोनाला रोखण्यासाठी लाॅक डाऊन घोषित करण्यात आला असून तो यशस्वी करण्यासाठी शहरातील बहुतांश रस्ते बंद करण्यात आले आहेत. या अनुषंगाने नेहरूनगर गायकवाड चाळीतील रहिवाशांनी चाळीतून जाणारा आपला वहिवाटीचा रस्ता झाडाच्या फांद्या आणि झुडपे टाकून बंद केला आहे.
गायकवाड चाळ ही नेहरूनगर परिसरातील जुनी सुपरिचित चाळ आहे. या चाळीतील भाडेकरूंसाठी असणारा वहिवाटीचा मार्ग आसपासच्या रस्त्यांना जोडणारा मार्ग आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत रस्ते बंद असल्यामुळे परिसरातील नागरिक “शॉर्टकट” म्हणून या वहिवाटीच्या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार धोकादायक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन गायकवाड चाळीतील लोकांनी सदर वहिवाटीचा रस्ता शनिवारपासून झाडाच्या फांद्या वगैरे टाकून तात्पुरता बंद करून टाकला आहे. या प्रकारामुळे दुकाने, आस्थापने, रस्ते आदी सर्व कांही बंद करण्याचे लोण आता चाळीपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते राहुल बडसकर यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी नेहरूनगर परिसरात निर्जंतुकीकरणासाठी फोगिंग करण्यात आले. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नेहरूनगरवासियात समाधान व्यक्त होत आहे.