रेशन दुकान म्हटलं की गर्दी मला अगोदर तुला अगोदर रेशन हवं यासाठी रस्सीखेच होत असते मात्र लॉक डाउन काळात बेळगाव शहरातील रेशन दुकाना समोरील चित्र बदललं आहे.
सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात बहुतांश दुकानदार आणि व्यापार्यांकडून नियमांचे उल्लंघन करत ग्राहकांची लूट केली जात आहे. चावडी गल्ली वडगाव येथील एका रेशन दुकानदाराने मात्र “ग्राहक देवो भव” असे म्हणत ग्राहकांसाठी चक्क खुर्च्यांची व्यवस्था करून सामाजिक अंतराचे भान राखत नवा आदर्श निर्माण केला आहे.कलमेश्वर रोड वडगांव सह अनेक रेशन दुकाना समोर खुर्च्या लावत सोशल डिस्टन्स पाळण्यात येत आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना हाती घेतले असून त्यासंदर्भातील सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. या सूचनांमध्ये सोशल डिस्टन्सींन अर्थात सामाजिक अंतर ठेवणे या नियमाचाही अंतर्भाव आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी सामाजिक अंतराचे भान ठेवावे, यासंदर्भात देशभरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
बेळगाव महानगरपालिकेने देखील शहरातील दुकाने व आस्थापनांच्या ठिकाणी सामाजिक अंतरासाठी मार्किंग करून जनजागृती केली आहे. परिणामी संबंधित ठिकाणी नागरिक मार्किंग केलेल्या ठिकाणी रांगेत उभे राहून खरेदी करताना दिसतात. पूर्वीसारखी गर्दी होत नसल्यामुळे आता दुकानदार देखील आपला व्यवसाय निवांतपणे करू लागले आहेत. दुकानदारांसाठी सोशल डिस्टन्स इन ते मार्किंग सोयीचे झाले असले तरी ग्राहकांना मात्र आपला नंबर येईपर्यंत बराच काळ ताटकळत उभे राहावे लागत आहे.
ग्राहकांच्या या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन चावडी गल्ली वडगाव येथील एका रेशन दुकानदाराने ग्राहकांचा त्रास कमी करण्यासाठी अभिनव पद्धत शोधून काढली आहे. या दुकानदाराने आपल्या रेशन दुकानासमोर रस्त्याच्या दुतर्फा सोशल डिस्टन्सिंगचे मार्किंग करून घेऊन त्या ठिकाणी ग्राहकांना बसण्यासाठी दोन्ही बाजुला चक्क 15 – 20 खुर्च्या ठेवल्या आहेत. यामुळे नागरिक याठिकाणी ताटकळत न थांबता आपला नंबर येईपर्यंत खुर्चीवर निवांत विश्रांती घेताना दिसून येतात.
संबंधित रेशन दुकानदाराच्या या उपक्रमाचे वडगाव परिसरात कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे रेशनसाठी पूर्वीसारखे आता उन्हातानात ताटकळत थांबावे लागत नसल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत आहे.