कॅम्प भागातून कोरोनाचा रुग्ण सापडल्यामुळे संपूर्ण कॅम्प परिसर पोलिसांनी सील केला आहे.कॅम्प परिसरातून बाहेर पडणाऱ्या वाहनांवर महानगरपालिकेतर्फे औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
शुक्रवारी बेळगावात कोरोनाने एंट्री केल्यावर अगोदर पासून सतर्क असलेल्या जिल्हा प्रशासन आणि पोलीस खात्याने अनेक तातडीच्या उपाययोजना केल्या आहेत.कॅम्प भागात रुग्ण सापडल्यामुळे कॅम्प भाग हा प्रशासनाने कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.

उभ्या मारुती कडून असो ग्लोब सिनेमाकडून असो किंवा फिश मार्केट कडून चारी बाजूनी कॅम्प भाग सील बंद करण्यात आला आहे.
तीन किलोमीटर परिसर सील करण्यात आला असून कॅम्प भागात जाणारे सगळे रस्ते जाळ्या लावून,बॅरिकेड्स लावून आणि बांबू बांधून सील करण्यात आले आहेत.कॅम्प भागातून कोणालाही घरातून बाहेर पडता येत नसून त्या भागातील सगळी दुकानही बंद करण्यात आली आहेत.