कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या डिसइन्फक्टंट स्प्रे टनल (डीएसटी) अर्थात जंतुनाशक फवारणी भुयाराचे नागरिकांकडून कौतुक केले जात असतानाच अवघे 24 तासही झाले नसताना सिव्हील हॉस्पिटल आवारातील डीएसटी यंत्रणा बंद पडल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत असून हा चर्चेचा विषय झाला आहे. तथापि यात कांही विशेष नसून सदर डीएसटी लवकरच कार्यान्वित होईल, असे हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सिव्हील हॉस्पिटल अर्थात बीम्सच्या प्रवेशद्वारावर रविवारी “डिसइन्फक्टंट स्प्रे टनल” बसविला. त्यामुळे त्यादिवशी हॉस्पिटलला भेट देणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईक आणि हितचिंतकांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या या कृतीचे कौतुक केले. रविवारी पहिल्या दिवशी या डीएसटीने जंतुनाशकाची फवारणी करून नागरिकांना निर्जंतुक करण्याचे आपले काम चोख पार पाडले. तथापि दुसऱ्या दिवशी मात्र सकाळीच हा डीएसटी बंद पडल्याचे निदर्शनास आले.
यासंदर्भात बोलताना आपल्या नातलग रुग्णाला भेटायला आलेल्या समीर शेख यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या कोरोना बाधित आणि संशयित काॅरंटाईन असलेल्या रुग्णांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला हॉस्पिटलला आवारात डीएसटीची अत्यंत गरज आहे, असे सांगितले. प्रशासनाने किमान करणाचे संकट दूर होईपर्यंत तरी या डीएसटीची व्यवस्थित देखभाल केली पाहिजे. परंतु सध्या तसे होताना दिसत नाही. कारण ज्या हेतूने सिव्हिल हॉस्पिटल येथे डीएसटी बसविण्यात आला होता तो साध्य होण्याऐवजी अवघा एक दिवसहि सदर डीएसटी कार्य करू शकला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे शेख म्हणाले.
आशा पावशे या रुग्ण महिलेने तर कोरोना विषाणूचा धोका प्रशासनाकडून गांभीर्याने घेतला जात नसल्याचा आरोप केला आहे. हॉस्पिटल आवारात डीएसटी बसवण्याचे नाटक प्रसिद्धी मिळवण्यासाठी करण्यात आले आहे. प्रत्यक्षात त्यांना कशाचेच गांभीर्य नसल्याचे दिसते. याचा पुरावा हवा असेल तर हॉस्पिटलच्या मेटरनिटी वॉर्डमध्ये बसलेले लोक अथवा तेथील गर्दी पहा. याठिकाणी सामाजिक अंतर पाळले जात नाही असेही आशा पावशे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान यासंदर्भात खुलासा करताना सध्या बसविण्यात आलेल्या डीएसटीचे काम अद्याप बाकी आहे. सदर काम पूर्ण होतात हा प्रकल्प सुरळीत कार्यरत राहील असे हॉस्पिटलच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मेटरनिटी वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असली तरी त्याठिकाणी सामाजिक अंतराच्या अंमलबजावणीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.