दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात किराणा दुकानदार जागीच ठार झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर जवळ घडली आहे.मंगळवारी सकाळी सातच्या दरम्यान हा अपघात येळ्ळूर सुळगा रोडवर घडला आहे.
राजहंसगडवरून बेळगावला दुकानाचे सामान आणण्यासाठी जात असताना हा अपघात घडला आहे. वाहन स्लिप होऊन डोक्याला जबर मार बसल्याने राजहंसगड येथील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
वैजू नागया बुर्लकट्टी (वय 52 राहणार गणपत गल्ली राजहंसगड) असे त्या दुर्दैवी इसमाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी भाऊ बहीण असा परिवार आहे. सकाळी साडेपाच वाजता बेळगावला किराणा सामान आणण्यासाठी जात असताना हा अपघात घडला आहे. सुळगा-राजहंसगड रस्त्यावर वाहन स्लीप झाल्याने डोक्याला जबर मार बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
संपूर्ण देशात लॉक डाऊन असल्यामुळे बेळगावातही याची दक्षता घेण्यात आली आहे. राजहंसगड तसेच इतर परिसरात बॅरिकेड्स लावून रस्ते अडविण्यात आले आहेत. काही वाहने सोडण्यात येत असले तरी बॅरिकेट्स बसविण्यात आल्याने वैजू यांना ते बॅरिकेट दिसले नाही. यातच समोरुन येणारे चारचाकी वाहन आणि बॅरिकेट चुकवताना नियंत्रण सुटल्याने वाहन स्लिप होऊन ते जागीच कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
या घटनेची माहिती वडगाव पोलिस स्थानकात देण्यात आली. पोलीसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल मधील शवागारात हलविण्यात आला असून उत्तरीय तपासणीनंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. वडगावचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत.
घटनास्थळी मयताच्या नातेवाईकांनी आक्रोश केला होता.दोन दिवसांपूर्वी येळ्ळूर वडगांव रोडवर अपघातात पोलीस उपनिरीक्षक ठार झाले होते आहे याचं येळ्ळूर रोडवर किराणा दुकानदार ठार झाला आहे या रोडवर होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे