लॉक डाऊनच्या काळात पुणे येथे निधन पावलेले बेळगावचे उद्योजक रामशिश देवनंदन शाह यांच्या असहाय्य बनलेल्या मुलाच्या मदतीला शिवसैनिक धावून गेल्यामुळे शाह यांचा मृतदेह बेळगावला आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे शक्य झाल्याची घटना सोमवारी घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बेळगावच्या भाग्यनगर दुसरा क्रॉस येथील रहिवासी उद्योजक रामशिश देवनंदन शाह हे अलीकडेच हिंजवडी पुणे येथे आपल्या मुलाकडे राहण्यास गेले होते. पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये सोमवारी त्यांचे निमोनियाने निधन झाले. त्यामुळे अंत्यसंस्कार पुण्यात करावेत की बेळगावला? या विवंचनेत पडलेल्या शाह यांच्या पत्नी व मुलाच्या मदतीला शिवसैनिक धावले.
लॉक डाऊनमुळे नातेवाईक व मित्र पुण्याला येऊ शकत नव्हते तसेच मृतदेह बेळगावला नेणे अवघड होते, त्यामुळे असहाय बनलेल्या शाह यांच्या मुलाने शिवसैनिक अरुण गावडे यांच्याशी संपर्क साधून आपली अडचण सांगितली. यासंदर्भात गावडे यांनी शाह यांच्या नातेवाईकांसह अनेकांशी संपर्क साधला परंतु संचार बंदीमुळे सर्वांनीच हात वर केले.
ही बाब बेळगाव सीमाभागातील शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी यांना समजताच त्यांनी मुंबई येथे शिवसेना भवनात संपर्क साधला. त्यानंतर पुणे येथील नगरसेवक प्रमोद भानगिरे यांना मदत करण्यास सांगण्यात आले. त्यांनी ससून हॉस्पिटलमधून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. तसेच पोलिसांशी संपर्क साधून राष्ट्रीय महामार्गावर कोणी अडवणार नाही अशी व्यवस्था केली. त्यामुळे अखेर रामशिश शाह यांचा मृतदेह बेळगावला आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करता आले. याबद्दल शाह परिवार आणि गुजराती समाजाने शिवसेनेचे आभार मानले आहेत.