कोरोनाचे धास्ती संपूर्ण जगाला लागून राहिले असले तरी अनेक ठिकाणी अफवांमुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. या परिस्थितीत अनेकांतून भीतीचे वातावरण निर्माण होत असले तरी ग्रामीण भागात मात्र अव्वाच्या सव्वा सांगून या रोगाबाबत अपप्रचार करण्यात धन्यता मानण्यात येत आहे. याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यात सध्या खळबळ किती आणि दक्षता असे त्रिशंकू अवस्था निर्माण झाले आहे.
गुरुवारी येळ्ळूर येथे कोरोना पॉझिटिव्ह महिला आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच बरोबर तालुक्यातील विविध गावातही दक्षता घेण्यात येत असून गावातील रस्ते व सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत. सध्या बेळगाव बंद झाले आहे. याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक गावात ही स्वयंस्फूर्तीने बंदी घालण्यात येत आहे.
बेळगाव तालुक्यातील उत्तर भागात दोघांना कोरोना झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. या बातमीमुळे संबंधित गावात तसेच परिसरात मोठी खळबळ माजली आहे. अशा परिस्थितीत त्यांना होम क्वारंटाइन कक्षात ठेवले आहे की आणखी कोठे हे कोणालाच माहिती नसली तरी संपूर्ण गावात मात्र एकच चर्चा आणि भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी एपीएमसी मार्केटमध्ये हिरे बागेवाडी येथील एक पॉझिटिव्ह रुग्ण गेला होता. यावेळी तो काहींच्या संपर्कात आल्याची चर्चा आहे. मात्र तो तालुक्यातील उत्तर भागातील एका अडत व्यापार्याच्या संपर्कात आल्याचे आढळून आले आहे. जेणेकरून सर्व दुकान सुरू ठेवावेत अशी मागणी करणाऱ्या त्या व्यापाऱ्याच्या संपर्कात आल्याने मोठी खळबळ माजली आहे. मात्र संबंधित व्यापाऱ्याला त्याची लागण झाली आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेले नसले तरी परिसरात चर्चा मात्र जोरदार सुरू आहे.
याचबरोबर तालुक्यातील अनेक भागातील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रोगापेक्षा भीतीमुळेच अधिक जण दगावले लागल्याचे दिसून येत आहे. सुरक्षित अंतर ठेवून जर सर्व व्यवहार केल्यास त्याची कोणतीच अडचण येणार नाही. मात्र अनेकांनी या रोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे सांगून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तालुक्यातील अफवांवर किती विश्वास ठेवावा हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. याकडे आता गांभीर्याने लक्ष देऊन अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.