लॉक डाऊनच्या काळात मालकाने घराबाहेर काढल्याने असहाय्य बनलेल्या युपी बिहारच्या तिघा भाडेकरूंना नगरसेवक आणि मनपा अधिकाऱ्यांनी त्यांचे भाड्याचे घर त्यांना परत मिळवून दिल्याची घटना बुधवारी घडली.
कोरोना प्रादुर्भावामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या काळात कोणत्याही घरमालकाने आपल्या भाडेकरूंना घर खाली करण्यास सांगू नये, असा आदेश केंद्र सरकारने काढला आहे. भाडेकरूंना घराबाहेर काढणे हा दखलपात्र गुन्हा ठरणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. सरकारचा हा आदेश डावलून कोतवाल गल्ली भाजी मार्केटनजीक असलेल्या एका घराच्या घर मालकाने आपले भाडेकरू असलेल्या तिघा युपी बिहारच्या भाडेकरूंना भाडे थकविल्यामुळे बुधवारी घराबाहेर काढले होते.
लोक डाऊनमुळे असहाय्य झालेले ते तिघेजण नगरसेवक बाबूलाल मुजावर यांना मध्यवर्ती बस स्थानकनजीक हताश अवस्थेत आढळून आले. तेंव्हा चौकशी अंती लॉक डाऊन समाप्त झाल्यानंतर घराचे भाडे देण्यास तयार असणाऱ्या त्या तिघा जणांवर अन्याय झाल्याचे मुजावर यांच्या लक्षात आले.
तेंव्हा नगरसेवक बाबूलाल मुजावर यांनी ही बाब महापालिकेचे कार्यकारी अभियंता हिरेमठ यांच्या कानावर घातली. अभियंता हिरेमठ यांनी त्या तिघा जणांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली त्याचप्रमाणे त्या तिघांना कोरोना तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर मुजावर यांच्यासह अभियंता हिरेमठ व महसूल अधिकारी दोड्डगौडा यांनी संबंधित घर मालकाला त्याची चूक निदर्शनास आणून दिली. लॉक डाऊनचा काळात भाडेकरूंना घराबाहेर काढणे हा गुन्हा असल्याचे त्याला समजावून सांगितले. त्यामुळे लॉक डाऊनचा कालावधी समाप्त झाल्यानंतर घराचे भाडे मिळाले पाहिजे या अटीवर त्या घरमालकाने संबंधित युपी बिहारच्या भाडेकरूंना पुन्हा घरात घेतल्याचे समजते.