Friday, November 8, 2024

/

कोरोनावरील उपचारासाठी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी बनविले “ईझीलेटर”

 belgaum

बेळगावातील दोघा इंजीनियरिंग अर्थात अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या नवी दिल्ली येथील मित्राच्या मदतीने कोरोनाग्रस्त रुग्णांवरील उपचारासाठी परवडणाऱ्या किंमतीचे व्हेंटिलेटर तयार केले आहे. या व्हेंटिलेटरची किंमत बाजारभावापेक्षा पाचपटीने कमी असून संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या या व्हेंटिलेटरला “ईझीलेटर” असे नांव दिले आहे.

बेळगावचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेचा विद्यार्थी ईल्टन डिसूजा आणि कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग शाखेचा विद्यार्थी सर्वेश कुलकर्णी यांनी उपरोक्त व्हेंटिलेटरचे डिझाईन बनवून तो तयार केला असून त्याचे “ईझीलेटर” असे नामकरण केले आहे. या व्हेंटिलेटर मधील प्रोग्रॅम कोड करण्यासाठी त्यांना दिल्लीचा त्यांचा मित्र आशिषकुमार सिंग याने मदत केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये श्वसनासंबंधी तीव्र त्रासाची जी लक्षणे दिसतात (एआरडीएस) त्यावर उपचार करण्याच्या दृष्टिकोनातून हे ईझीलेटर बनविण्यात आल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे अवघ्या 20 हजार रुपयांमध्ये हे ईझीलेटर (व्हेंटिलेटर) युनिट तयार करता येते. ईल्टन, सर्वेश आणि आशिषकुमार या तिघांनी हे व्हेंटीलेटर बनविले असले तरी त्याला आरोग्य तज्ञांसह सरकारची मान्यता मिळणे बाकी आहे.Engneer

गेल्या 20 मार्च रोजी टीव्हीवर कोरोना संबंधी बातम्या पाहत असताना काळाची गरज लक्षात घेऊन कमी खर्चात कोरोनाग्रस्तांसाठी व्हेंटिलेटर बनविण्याचा विचार माझ्या आणि सर्वेशच्या डोक्यात आला. त्यासाठी आम्ही लागलीच कामाला लागलो प्रथम आम्ही उभयतांनी व्हेंटिलेटर कसे बनवायचे यावर अभ्यास व संशोधन केले. व्हेंटिलेटरचे तंत्रज्ञान आणि कोरोना बाधितांसाठी ते कसे प्रभावी उपचार करू शकते, याचा अभ्यास केल्यानंतर गेल्या 25 मार्च रोजी आम्ही आमच्या व्हेंटिलेटरचे डिझाईन पूर्ण केले आणि प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली, अशी माहिती ईल्टन डिसोजा याने दिली. यासाठी सरकारच्या परवानगीने आम्ही बेळगावातील के – टेक कंपनीच्या प्रयोग शाळेचा वापर करून हे व्हेंटिलेटर तयार केले आहे. आता त्याची कृत्रिम यांत्रिक फुफ्फुसांवर चाचणी घेतली जाणार असून त्यानंतर आरोग्य तज्ञांकडून मान्यता मिळण्यासाठी या व्हेंटिलेटरचा मनुष्यावर प्रयोग केला जाणार असल्याचे सर्वेश कुलकर्णी यांने स्पष्ट केले आहे.

कोरोना रुग्णांसाठी जीवनावश्यक असलेल्या ह्युमिडिफिकेशन आणि ऑक्सिजन ब्लींडींग या व्हेंटिलेटरमध्ये असून ईझीलेटर वेब ॲपद्वारे त्यांच्यावर नियंत्रण व देखरेख ठेवता येते. ज्यामुळे डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा कोरोना बाधित रुग्णाशी थेट संबंध येत नाही. कोणताही व्यावसायिक हेतू न बाळगता ईल्टन आणि सर्वेश यांनी एका उदात्त कार्यासाठी तयार केलेले हे “ईझीलेटर” म्हणजे कोरोना योद्ध्यांच्या मदतीसाठी केलेला एक प्रयत्न आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.