गेले तीन दिवस दिलासादायक ठरल्यानंतर बेळगाव शहरातील आझाद गल्ली येथील एक 25 वर्षीय महिला मंगळवारी 21 एप्रिल रोजी कोरोना बाधित आढळून आली आहे. संकेश्वर येथील आपल्या वडिलांच्या संपर्कात आल्याने तिला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले असून यामुळे बेळगाव शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 7 झाली आहे. दरम्यान कोरोना मुक्त झालेल्या आणखी दोन रुग्णांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 3 झाली आहे.
काल सोमवार दिनांक 20 रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून आज मंगळवार दिनांक 21 एप्रिल 2020 रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत बेळगाव शहरात एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. सदर 25 वर्षीय महिला आझाद गल्ली बेळगाव येथील रहिवासी आहे. आपले वडीलांच्या (संकेश्वर येथील पी – 293 क्रमांकाचा रुग्ण) संपर्कात आल्याने तिला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आता शहरातील कोरोना बाधितांची संख्या 7 झाली आहे.
दरम्यान, सिव्हील हॉस्पिटल (बीम्स)मधून आज मंगळवारी उपचारांनी ती पूर्णपणे बरा झालेल्या दोघा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. हिरेबागेवाडी येथील 20 वर्षीय युवक (क्र. पी – 128) आणि कुडची येथील 45 वर्षीय महिला (क्र. पी – 142) असे डिस्चार्ज दिलेले दोन रुग्ण आहेत. यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता तीन झाले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 43 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे तर तिघाजणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बेळगाव महानगरपालिका व्याप्तीत आतापर्यंत आढळून आलेल्या 7 कोरोना बाधित रुग्णांमध्ये कॅम्प येथील 4 आणि अमननगर, अस्मा कॉलनी संगमेश्वरनगर व आझाद गल्ली येथील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान आज आझाद गल्ली येथे कोरोना बाधित महिला आढळून आल्यामुळे हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.