कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिनोळी येथील बेळगाव – चंदगड सीमा सील डाऊन करण्यात आली आहे. याठिकाणी चंदगड येथून बेळगावकडे येणाऱ्या रुग्णवाहिकांना प्रवेश नाकारण्यात येत असल्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात येत असून बुधवारी एका रुग्णाचा मृत्यू झाला. तेंव्हा आता तरी चंदगडमधून येणाऱ्या रुग्णवाहिकांना बेळगावमध्ये प्रवेश दिला जावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
गेल्या कांही दिवसापासून कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बेळगाव जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्हा सील डाऊन केला आहे. यासाठी बेळगाव आणि चंदगड तालुक्याच्या सीमेवर चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणी महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक वाहनाला बेळगावात प्रवेशबंदी केली जात आहे. रुग्णवाहिकांना देखील या ठिकाणी प्रवेश नाकारला जात आहे. यामुळे चंदगड तालुक्यातील अत्यवस्थ रुग्णांच्या नातलगांची मोठी गैरसोय होत आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणीही रुग्णांना घेऊन येणाऱ्या चंदगडवासियांची संख्या जास्त आहे. मात्र आता रुग्णवाहिकांना देखील बेळगावात प्रवेश बंदी असल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली असून काहींच्या जीवावर बेतले आहे.
कागणी (ता. चंदगड) येथील शेतकरी पुंडलिक आपटेकर (वय 48) याचा सर्पदंशाने झालेला मृत्यू हे याचे ताजे उदाहरण आहे. शेतात काम करत असताना बुधवारी 22 रोजी दुपारी 12 च्या सुमारास पुंडलिक याला विषारी सापाने दंश केला. त्यामुळे त्याला प्रथम कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तथापि त्याठिकाणी उपचारास प्रतिसाद न मिळाल्यामुळे नातलगांना त्याला बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये न्यावयाचे होते. मात्र सीमेपलीकडे रुग्णवाहिका नेण्यास बंदी असल्यामुळे पुंडलिकला कोवाडहून 40 कि. मी. अंतरावरील गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तथापि तोपर्यंत उशीर झाल्यामुळे दुर्दैवाने पुंडलिक आपटेकर याला मृत्यूने गाठले होते.
बेळगाव – चंदगड सीमेवरील रुग्णवाहिकांच्या प्रवेश बंदीमुळे या पद्धतीने रुग्णांचे जीव धोक्यात येत आहेत. दरम्यान, याची बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. आमदार बेनके यांनी बेळगाव पोलीस आयुक्त लोकेश कुमार यांना याबाबत सूचना करून रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्याची विनंती केली आहे. त्याचप्रमाणे सरकारी रुग्णवाहिका कोणत्याही परिस्थितीत रोखता येणार नाहीत. असा प्रकार घडल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल, असेही आमदार अनिल बेनके यांनी स्पष्ट केले आहे. चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी देखील यासंदर्भात कोल्हापूरचे जिल्हा पालकमंत्री सतेज पाटील यांना कळविले आहे. उपरोक्त समस्येसंदर्भात बेळगाव जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात येतील. तसेच रुग्णांचे हाल होऊ नयेत याची पुरेपुर काळजी घेतली जाईल असे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले आहे.
लॉक डाऊन काळात अत्यावश्यक सेवांना मुभा दिली आहे चंदगड तालुका वैद्यकीय सेवेसाठी बेळगाव शहरावर अवलंबून आहे. चंदगड तालुक्यातून दररोज शेकडो रुग्ण बेळगाव येथे ये-जा करत असतात. मात्र आता खासगीच नव्हेतर सरकारी रुग्णवाहिकांना देखील कर्नाटक चेक पोस्टवर अडविले जात असल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.