लाॅक डाऊनचा कालावधी येत्या 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आल्यामुळे विशेष सेवा बजावणाऱ्या नागरिकांना शहरातील सुलभ संचारासाठी पोलीस खात्याकडून आता नव्याने “पास” वितरित केले जात आहेत. तथापि हे पास मिळवण्यासाठी खरोखर पासची गरज असलेल्या नागरिकांसह वशिलेबाज लोकांची उडणारी झुंबड सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
देशव्यापी लॉक डाऊनचा कालावधी 19 दिवसांसाठी म्हणजे येत्या 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. लॉक डाऊनच्या संचार बंदी सदृश्य काळात शहरात संचार करणे सुलभ जावे यासाठी जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे दुकानदार, व्यापारी, औषध दुकानदार, गोरगरीब गरजूंची सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते, संघ संस्थांचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य, खाजगी रुग्णवाहिका चालक आदिंना पोलीस खात्याकडून पासची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील 21 दिवसांच्या लॉक डाऊन साठी अशाप्रकारे पासचे वितरण करण्यात आले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊनसाठी देखील 19 दिवसांच्या वाढीव कालावधीचे सुधारित पास वितरीत केले जात आहेत.
पोलीस आयुक्तालय कार्यालय येथे यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. तथापि सध्या याठिकाणी पास मिळवण्यासाठी नागरिक आणि कार्यकर्त्यांची एकच झुंबड उडताना दिसत आहे. संबंधित पोलीस अधिकारी कागदपत्रे तपासणी याबरोबरच संपूर्ण शहानिशा करून संबंधितांना पासचे वितरण करत आहेत. यात वेळ जात असून शिवाय कांहीवेळा संबंधित पोलिस अधिकारी कांही कामानिमित्त बाहेर गेले असल्यास नागरिकांवर तासंतास ताटकळत थांबण्याच्या दिव्यातून जावे लागत आहे. पोलीस खात्याकडून पास मिळवण्याची खरोखरच ज्यांना गरज आहे त्या मंडळींसह लॉक डाऊनच्या काळात शहरात अनावश्यक फेरफटका मारून स्वतःला मिरवू इच्छिणाऱ्या मंडळींनी देखील पोलीस आयुक्तालय येथे गर्दी केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, लॉक डाऊनच्या काळात शहरात अनावश्यक फेरफटका मारून स्वतःला मिरवू इच्छिणारे कांही अतिउत्साही कार्यकर्ते नेतेमंडळींचे शिफारस पत्र स्वतःसोबत घेऊन येत आहेत. तथापि पोलीस अधिकारी अशा शिफारस पत्रांना “शून्य” किंमत देऊन ती बाजूला ठेवून देत आहेत अथवा त्या पत्रांना कचऱ्याची टोपली दाखवत आहेत. विद्यमान आमदारांचे शिफारस पत्र घेऊन येणाऱ्या कांही कार्यकर्त्यांपैकी एका कार्यकर्त्याचे शिफारस पत्र पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या समक्षच फाडून टाकल्याचे समजते. वशिलेबाजीला थारा न देता संबंधित पोलीस अधिकारी आपले काम चोखपणे पणे पार पाडत असले तरी पास मिळविण्यासाठी होणारी गर्दी सध्या त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.