Wednesday, November 20, 2024

/

माणुसकीचा अनुकरणीय आदर्श सुरेंद्र ..

 belgaum

कोरोनाची भीती त्यांनासुद्धा आहे, परंतु कोरोना पेक्षा माणुसकी मोठी असे ते मानतात. आज सामाजिक अंतरामुळे माणसे परस्परांमध्ये अंतर राखून आहेत. परंतु आपल्या विशाल अंतकरणाने अनेक गरजू गरीब आणि वंचितांना मदत करत माणुसकीचा अनुकरणीय आदर्श घालून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर हे होय.

समाजसेवा जणू त्यांच्या रक्तातच भिनली आहे. सध्याच्या लॉक डाऊनच्या काळात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल गरीब गरजू रुग्णांसाठी तर सुरेंद्र अनगोळकर जणू देवदूता सारखे आहेत. लॉक डाऊनमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थिती विरुद्ध लढा देण्यासाठी शहरातील जे मोजके लढवय्ये सामाजिक कार्यकर्ते पुढे सरसावलेत त्यामध्ये सुरेंद्र अनगोळकर अग्रभागी आहेत.

कोरोना विषाणु प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मालवाहतूक वगळता प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. याचा फटका सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना बसत आहे. आपल्या गावी जाण्यास वाहनाची सोय नसल्यामुळे अडकून पडलेल्या या लोकांना सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या स्वरूपात मोठा आधार मिळाला आहे. लॉक लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून वाहन व्यवस्था नसल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल येथे अडकून पडलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना गावी जाण्यासाठी सुरेंद्र अनगोळकर स्वखर्चाने वाहनांची मोफत सोय उपलब्ध करून देत आहेत. परिणामी संबंधित रुग्ण आणि त्याचे नातेवाईक अनगोळकर यांना दुवा देताना दिसतात.

खानापूर तालुक्यातील हलशीनजीकच्या मेरडा गावातील अभिजीत मोहन पाटील या 12 वर्षीय जखमी मुलाला आज गुरुवारी जिल्हा इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला. झाडावरून पडल्यामुळे अभिजीत याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधून गुरुवारी डिस्चार्ज मिळाल्यानंतर प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे अभिजीतला गावी परत कसे घेऊन जायचे? असा प्रश्न आई-वडिलांना पडला होता. तेंव्हा सुरेंद्र अनगोळकर त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी स्वतःच्या कारगाडीतून अभिजीत पाटील आणि त्याच्या आई-वडिलांना मेरडा गावी सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था केली. याबद्दल अभिजीतची आई अनिता पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना सुरेंद्र अनगोळकर यांच्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले.

Surendra angolkar
Food for needy help again shows humanity

गोरगरीब आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सुरेंद्र अनगोळकर यांनी आजपर्यंत शेकडो लोकांना मदतीचा हात दिला आहे. कफल्लक गरीब गरजू नागरिकांसाठी त्यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. त्याचप्रमाणे एखाद्या गरीब रुग्णाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला तर मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी खिशात पैसे नसल्यामुळे रुग्णाच्या गरीब नातेवाईकांची कुचंबना होते. अशा लोकांसाठी अनगोळकर यांनी स्वखर्चाने मोफत शववाहिकेचीही व्यवस्था केली आहे.

याव्यतिरिक्त गरीब भुकेल्यांना जेवण देणे हा तर सुरेंद्र अनगोळकर यांचा रोजचा दिनक्रम आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या गरीब कुटुंबातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अनगोळकर दररोज सायंकाळनंतर अन्नछत्र चालवतात. सध्या लॉक डाऊनच्या काळात गोरगरिबांचे पोटापाण्याचे हाल होत असल्यामुळे अनेक संघ संस्था आणि कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावले आहेत, ही स्तुत्य बाब आहे. तथापि पैशाअभावी गोरगरिबांच्या पोटापाण्याचे जे हाल होतात त्याची दखल सुरेंद्र अनगोळकर यांनी फार पूर्वीच घेतली आहे हे विशेष होय.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.