राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये गेल्या 24 तासात आणखी 18 जणांची भर पडली असल्यामुळे गुरुवार दि 23 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 445 इतकी झाली आहे. यापैकी 17 जणांचा मृत्यू झाला असून 145 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या प्रसिद्धी पत्रकानुसार बुधवार 22 एप्रिल सायंकाळी 5 वाजल्यापासून आज गुरुवार 23 एप्रिल सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील बेंगलोर शहर, विजयपुरा, हुबळी – धारवाड, मंगळूर, कलबुर्गी व मंड्या येथे एकूण 18 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये बेंगळूर शहरातील 10, विजयपुरा, हुबळी धारवाड व मंड्या येथील प्रत्येकी 2 तसेच बंटवाला मंगळूर व कलबुर्गी येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात सर्वाधिक करोना बाधित रुग्ण बेंगलोर शहरात (101) आढळून आले असून त्याखालोखाल अनुक्रमे म्हैसूर (88) आणि बेळगावचा (43) क्रमांक लागतो.
कर्नाटक राज्यातील एकूण 19 जिल्ह्यांमध्ये एकूण 445 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून या जिल्ह्यांची नावे आणि रुग्णांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहेत. बेंगलोर शहर (110 पॉझिटिव्ह रुग्ण), म्हैसूर (88), बेळगाव (43), विजयपूरा (37), कलबुर्गी (36), बागलकोट (21), चिकबेळ्ळापूर (16), मंगळूर (16), बिदर (15), मंड्या (14), बेळ्ळारी (13), बेंगलोर ग्रामीण (12), कारवार (11), धारवाड (9), गदग (4), उडपी (3), दावणगिरी (2), तुमकूर (2) आणि चित्रदुर्ग (1 पॉझिटिव्ह रुग्ण).