बेळगाव जिल्हा प्रशासन आणि आरोग्य खात्याच्यावतीने काॅरन्टाईन केलेले बेळगाव जिल्ह्यातील 121 जण पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना घरी जाऊ देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी रविवारी सायंकाळी दिली.
बेळगाव जिल्हा प्रशासनाच्यावतीने इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी 121 जण काॅरन्टाईनच्या निर्धारित कालावधीत उपचाराअंती पूर्णपणे बरे झाल्यामुळे रविवारी सायंकाळी त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. सदर 121 जणांमध्ये बेळगाव केंद्रातील 87 जणांचा आणि रायबाग तालुका केंद्रातील 34 जणांचा समावेश आहे. घरी जाऊ देण्यापूर्वी या सर्वांच्या घशातील द्रावाची अर्थात स्लॅबची चोवीस तासात दोन वेळा करूणा चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे संबंधित 121 जणांच्या घरी जाण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी माहितीही जिल्हाधिकारी डॉ. बोमनहळ्ळी यांनी दिली.
सदर 121 जणांनी शासनाचा इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईनचा कालावधी पूर्ण केला असला तरी घरी गेल्यानंतर त्यांना 14 दिवस सक्तीने होम काॅरन्टाईन पाळावे लागणार आहे. यासाठी त्यांच्यावर सॉफ्टवेअर आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून काटेकोर लक्ष ठेवले जाणार आहे असे सांगून आरोग्य खाते महसूल खाते आणि पोलीस खात्याच्या प्रयत्नांमुळेच संबंधित रुग्ण कोरोनाच्या संकटातून वाचले असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी सांगितले.
*1,320 नमुने निगेटिव्ह*
दरम्यान, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने प्रसिद्धीस दिलेल्या वैद्यकीय पत्रकानुसार बेळगाव जिल्ह्यात रविवार दि. 26 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील 3,166 जणांचे निरीक्षण पूर्ण झाले असून 2,222 जणांचे स्वॅबचे नमुने प्रयोगशाळेत धाडण्यात आले आहेत. त्यापैकी पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या नमुन्यांची संख्या अद्याप 54 (1) असून 1,320 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
बेळगाव जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या सर्व्हिलन्स युनिटने जाहीर केलेल्या वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार रविवार दि. 26 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोनासंदर्भात बेळगाव जिल्ह्यात एकूण 3,166 संशयित व्यक्तींचे वैद्यकीय निरीक्षण करण्यात आले. 14 दिवसांसाठी होम काॅरन्टाईन केलेल्या जिल्ह्यातील व्यक्तींची संख्या 1,083 झाली असून हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 47 आहे. काॅरन्टाईन अर्थात विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या लोकांची संख्या 908 आहे, तर काॅरन्टाईनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या व्यक्तींची संख्या 1,128 आहे. कोरोना विषाणू संसर्ग निदानासाठी एकूण 2,222 जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी अद्यापपर्यंत 54 (1) नमुन्यांचा वैद्यकीय रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे 1,320 नमुने निगेटिव्ह असून ॲक्टिव्ह केसीस 47 आहेत. त्याचप्रमाणे 826 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 4 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गापासून मुक्त अर्थात पूर्णपणे बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 49 केसीस ऍक्टिव्ह आहेत.