सरकारी प्राथमिक शाळा येळ्ळूरवाडी, येळ्ळूर येथे अत्यंत दुर्मिळ आणि विषारी असा “पोवळा साप” आढळून आला. सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी सदर सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
सरकारी प्राथमिक शाळा येळ्ळूरवाडी, येथे एक वेगळाच साप आढळून आल्याची माहिती मिळताच सर्पमित्र आनंद चिट्टी तरी त्या ठिकाणी जाऊन सापाला शिताफीने पकडले. यावेळी चिट्टी यांनी त्या सापाची पाहणी केली असता तो अत्यंत दुर्मिळ आणि विषारी असा पोवळा साप असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
डोके आणि मान काळी असणाऱ्या तपकिरी रंगाच्या या विषारी सापाची लांबी 54 सेंटीमीटरपर्यंत वाढते. तसेच शेपटीवर दोन काळे आडवे पट्टे असतात. लांबट सडपातळ शरीर असणाऱ्या या सापाच्या अंगावर खवले असतात आणि पोटाचा रंग लाल असतो. हा साप निशाचर असून त्याला डिवचले तर हा आपली शेपटी वर करून आत्मसंरक्षणासाठी खवल्यांचा लाल रंग दाखवतो. हा साप मुख्यत्वेकरून जमिनीत, दगडांखाली किंवा वाळलेल्या पानांखाली वास्तव्य करतो. वाळवी, गांडूळ, छोटे कीटक हे याचे मुख्य खाद्य आहे. हा सर्प जरी विषारी असला तरी अतिशय मवाळ असतो. या सापाच्या दंशाने मृत्यू घडल्याची नोंद नसली तरी दंशाने सूज मात्र येते.
हा देशातील सर्वात सडपातळ विषारी साप असून या सर्पांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. हा साप महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तामिळनाडू व कर्नाटक या राज्यात आढळत असल्याची नोंद आहे. या सापाची मादी वाळलेल्या पानांखाली किंवा दगडाच्या सपाटीत अर्थात खोबणीमध्ये 2 ते 7 अंडी घालते,अशी माहिती सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी सदर सर्पाला नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर दिली.