बेळगाव एपीएमसी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्स इन म्हणजेच सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचे कानावर येताच महानगरपालिकेच्या अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांनी स्वतः तिथे जाऊन भाजी विक्रेत्यांना धारेवर धरले आणि त्यांना सामाजिक अंतर ठेवण्यास भाग पाडले.
प्राणघातक कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींग अर्थात सामाजिक अंतर ठेवणे या सूचनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. तथापि बेळगाव एपीएमसी मार्केटमध्ये या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येत असल्याने या ठिकाणी शुक्रवारी सकाळपासून महापालिकेचे एक पथक नियुक्त करण्यात आले होत. एपीएमसीमध्ये विविध प्रकारचा भाजीपाला, कांदे, बटाटे, रताळी आधी कृषी उत्पादनांची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्याप्रमाणे आज शुक्रवारी देखील मोठी गर्दी झाली होती. यामुळे कोरोना विषाणूसंदर्भातील सामाजिक अंतर ठेवणे तसेच सद्यपरिस्थितीत एका ठिकाणी बसून भाजी विक्री करू नये हा नियम पायदळी तुडविला जात होता. यासंदर्भात त्या ठिकाणी नियुक्त महापालिकेच्या पथकाने शेतकऱ्यांना समजावण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला तथापि त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ही बाब महापालिकेच्या अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांच्या कानावर येताच त्या त्वरित एपीएमसी मार्केट यार्ड येथे दाखल झाल्या.
प्रारंभी निपाणीकर यांनी सामाजिक अंतर ठेवण्याचे महत्व भाजीपाल्याची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तुमच्या जीविताच्या रक्षणासाठी आम्ही हे सांगत आहोत असे सांगूनही आपल्या सांगण्याकडे शेतकरी दुर्लक्ष करत आहेत हे ध्यानात येताच लक्ष्मी निप्पाणीकर यांचा पारा चढला आणि त्यांनी हातात लाठी घेऊन भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना सामाजिक अंतर ठेवून भाजीपाल्याची विक्री करण्यास भाग पाडले.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनाबद्दल ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग अद्यापही अनभिज्ञ आहे. त्यामुळे सामाजिक अंतर वगैरे सूचनांचा अंमलबजावणी करणे सद्यपरिस्थितीत किती महत्त्वाचे आहे याची त्यांना जाणीव नाही. त्यामुळेच आज आपल्याला नाईलाजाने हातात लाठी घ्यावी लागल्याचे मनपा अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर यांनी बेळगाव लाइव्हशी बोलताना सांगितले. तसेच एपीएमसी भाजी मार्केटमध्ये सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमाचे काटेकोर पालन व्हावे यासाठी जिल्हा प्रशासन उद्यापासून योग्य ती क्रम घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.