लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर शहापूर व खासबाग परिसरातील काही मोजक्याच दुकानदारांना चिकन व मटण विक्रीची परवानगी देण्यात आल्याने तीव्र नापसंती व्यक्त होत आहे. तसेच परवानगी द्यायची असेल तर सर्वांनाच द्या अन्यथा सरसकट सर्व दुकाने बंद ठेवा, अशी मागणीही केली जात आहे.
लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर चिकन व मटण विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सरकारने लाॅक डाऊनच्या काळात चिकन व मटण विक्रीस परवानगी दिल्यामुळे संबंधित दुकानदारांनी आपली दुकाने सुरू केली होती. परंतु आता पोलिसांकडून वडगाव व खासबाग भागातील चिकन व मटण दुकाने बंद करण्यास सांगितले जात असून हे करताना काही दुकानदारांना दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली जात आहे तेव्हा हा दुजाभाव कशासाठी? असा सवाल अन्य दुकानदारांकडून केला जात आहे. तसेच एक तर सर्वांना दुकाने खुली करण्याची परवानगी द्या अन्यथा सरसकट सर्व दुकाने बंद करा अशी मागणीही केली जात आहे.
दरम्यान, सरकारने मटण दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी बकऱ्यांच्या बाजारावर बंदी असल्यामुळे बकरी आणायची कुठून? असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे. त्यामुळे बहुतांश दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवण्यात पसंत केले आहे.