देशातील कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने देशभरातील आपल्या सर्व पॅसेंजर रेल्वे आणि कोंकण रेल्वे वाहतूक बंदीचा कालावधी येत्या मंगळवार दि. 31 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाढविला आहे.
भारतीय रेल्वेच्या सर्व मूळ लांब पल्ल्याच्या मेल / एक्सप्रेस आणि सर्व मूळ पॅसेंजर रेल्वे गाड्या येत्या 31 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यापूर्वी दिलेल्या सूचनेनुसार उपनगरी रेल्वे आणि कोलकाता मेट्रो रेल्वेच्या सर्व गाड्या कमीत कमी प्रमाणात रविवारी 22 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यानंतर मात्र देशातील सर्व उपनगरी रेल्वे आणि मेट्रो रेल्वे येत्या 31 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
ज्या रेल्वेगाड्या रविवार 22 मार्चच्या चार तास आधीच म्हणजे शनिवारी रात्री प्रवासाला निघाल्या आहेत, त्या मात्र आपापल्या मुक्कामापर्यंत धावतील. भाडेतत्त्वावरील रेल्वे वाहतूक मात्र सुरू राहणार असल्याचे भारतीय रेल्वेने एका पत्रकाद्वारे कळविले आहे. त्याचप्रमाणे विभागीय रेल्वे खात्यांनी उपरोक्त सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.