सध्याच्या लॉक डाऊन मुळे अनेक जणांवर आपले गाव आणि घरापासून दूर अडकून पडण्याची वेळ आली आहे. अशाच निपाणी येथे अडकून पडलेल्या एका गर्भवती महिलेसह तिच्या आई-वडिलांना खडक गल्ली येथील सेवाभावी कार्यकर्त्यांनी सुखरूप त्यांच्या घरी आणून सोडल्याची घटना रविवारी घडली.
गर्भवती महिलेला तिच्या आई-वडिलांसह सुखरूप शास्त्रीनगर येथील त्यांच्या घरी आणून सोडणाऱ्या खडक गल्ली येथील सेवाभावी कार्यकर्त्यांची नावे विश्वजीत चौगुले आणि संजय जाधव अशी आहेत. हे दोघेही आमदार अॅड. अनिल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाभावी कार्य करतात. यासाठी आमदार बेनके यांनी त्यांना खास ओळखपत्रही देऊ केले आहे.
उपरोक्त घटनेची माहिती अशी की, शास्त्रीनगर बेळगाव येथील मंजुनाथ रायकर व मीना रायकर हे दांपत्य आपली विवाहित गर्भवती मुलगी नम्रता रेवणकर हिला आणण्यासाठी गेल्या शनिवारी निपाणी येथे गेले होते. दरम्यान याच कालावधीत देशव्यापी लॉक डाऊनची घोषणा करण्यात आल्यामुळे रायकर दाम्पत्य आपल्या मुलीसह निपाणी तर अडकून पडले होते. यासंदर्भात त्यांनी संपर्क साधल्यानंतर विश्वजीत चौगुले आणि संजय जाधव यांनी तात्काळ निपाणीला धाव घेतली. तसेच स्वखर्चाने आपल्या कारगाडीतून मंजुनाथ रायकर, मीना रायकर, गर्भवती नम्रता रेवणकर व रत्नाबाई रेवणकर अशा चौघाजणांना शास्त्रीनगर येथील त्यांच्या घरी सुखरूप परत आणून सोडले.
लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर खडक गल्लीतील विश्वजीत चौगुले व संजय जाधव यांनी सेवाभावी कार्याचा सपाटा लावला असून गेल्या शुक्रवारी विश्वजीत याने कंग्राळी खुर्द येथे सासरवाडीत अडकून पडलेल्या कणकवली येथील मीना बोभाटे या महिलेला हलकर्णी फाट्यापर्यंत सुखरूप नेऊन पोहोचविले. तेथून ती महिला आपल्या नातेवाईकांसह कणकवलीला रवाना झाली. विश्वजीत चौगुले व संजय जाधव यांनी हाती घेतलेल्या या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वतः पोलीस बंदोबस्तात अडकून पडल्यामुळे सध्या पोलीस खात्यालाही बेळगाव परिसरात अडकून पडलेल्या विविध ठिकाणच्या नागरिकांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी या युवकांचे सहकार्य लाभत आहे.