धोकादायक कोरोना विषाणूचा राज्यातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सरकारकडून 200 कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक “लॉकडाऊन” चा कालावधी अर्थात राज्यव्यापी बंदचा कालावधी 31 मार्च 2020 पर्यंत वाढविण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज बुधवारी दुपारी 200 कोटी रुपयांच्या निधीची आणि राज्यातील बंदचा कालावधी वाढवल्याची घोषणा केली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने 31 मार्चपर्यंत कर्नाटक लॉक डाऊन करण्याचा हा निर्णय घेतला आहे. परिणामी शॉपिंग मॉल्स, चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, क्लब्स,पब्स आदींसह अन्य व्यापारी आस्थापने पुढील आणखी 13 दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. राज्यातील शाळा-कॉलेज आणि विद्यापीठांना जाहीर करण्यात आलेल्या सुट्टीचा कालावधी देखील वाढविण्यात आला असून या सर्व शैक्षणिक संस्था 31 मार्चपर्यंत बंद असणार आहेत.
संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यात्रा आणि ठरलेले लग्न समारंभ अत्यंत साध्या पद्धतीने आयोजित केले जावेत या सूचनेसह शासनाने दिलेल्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी सीमावर्ती भागात आरोग्य तपासणी केंद्र उघडण्यात आली आहेत. याठिकाणी परराज्यातून अथवा परगावाहून येणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे. विदेशी प्रवाशांचे 15 दिवस स्क्रीनिंग आणि (विलगीकरण) आयसोलेशन केले जाणार आहे.