कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या देशव्यापी लॉक डाऊनच्या कालावधी बेळगाव एपीएमसी मार्केट यार्ड येथील व्यवहार सुरक्षित व सुरळीत पार पडावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत भाजी खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्याचा आदेश दिला आहे.
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात बेळगाव एपीएमसी यार्ड येथील भाजी मार्केट हे उत्तर कर्नाटकातील मोठे भाजी मार्केट आहे या ठिकाणी हजारो लोक भाजीपाला खरेदी विक्रीसाठी येत असल्यामुळे दररोज मोठी उलाढाल होत असते. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉक डाऊन जाहीर करण्याबरोबरच खबरदारीच्या विविध सूचना देण्यात आले आहेत. कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतर ठेवा ही यापैकी एक प्रमुख सूचना आहे. तथापि गेल्या काही दिवसांपासून एपीएमसी मार्केट यार्ड येथे या सूचनेकडे साफ दुर्लक्ष करून भाजीपाला खरेदी विक्रीसाठी गर्दी केली जात असल्याचे लक्षात आल्याने जिल्हा प्रशासनाने शनिवार दि. 28 मार्चपासून याठिकाणी सामाजिक अंतर ठेवून सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत भाजीपाला खरेदी-विक्री व्यवहार केले जावेत असा आदेश बजावला आहे. तसेच सोशल डिस्टन्स अर्थात सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचनेचे उल्लंघन करणार्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्याला दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत एपीएमसी मार्केट यार्ड येथे भाजीपाला खरेदी विक्रीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सदर मागणी अमान्य करून प्रशासनाने त्यासाठी सकाळची वेळ ठरवून दिली आहे. तसेच कमीत कमी लोकांनी बाजाराच्या ठिकाणी थांबून भाजी खरेदी-विक्री व्यवहार करावेत, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
दरम्यान शहरातील नागरिकांना भेडसावणारा दररोजच्या भाजीपाल्याचा प्रश्न प्रशासनाने निकालात काढला आहे. देशव्यापी लॉक डाऊन असला तरी नागरिकांना रोजच्यारोज ताजा भाजीपाला व फळे मिळावी त्यासाठी शहराच्या प्रत्येक वॉर्डांमध्ये फळ-भाजीपाल्याच्या फिरत्या गाड्यांची सोय केली जाणार आहे. नागरिकांवर घर सोडून बाजारात जाण्याची वेळ येऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.