सुळेभावी महालक्ष्मीच्या महिमेवर आधारित जात्रे बन्तु या कन्नड लघुपटात काम करून बेळगावात नावारूपाला आलेली स्नेहा पाटील हिला आणखी एक पुरस्कार मिळाला आहे.
स्नेहाच्या लावणीला दाद देत महाराष्ट्रातून एक पुरस्कार मिळाला आहे.शिवलीला सांस्कृतिक कला मंच सांगली (महाराष्ट्र) या संस्थेतर्फे काल शनिवारी आयोजित 17 व्या महाराष्ट्रीय लोककला महोत्सवात बेळगांवची सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी स्नेहा अनंत नागनगौडा – पाटील हिला “महाराष्ट्र भूषण कलेचे शिलेदार”हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह सांगली येथे 17 व्या
महाराष्ट्रीय लोककला महोत्सव आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते खणगांव – बेळगांवच्या
स्नेहा अनंत नागनगौडा – पाटील हिला “महाराष्ट्र भूषण कलेचे शिलेदार”हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना संयोजक सुरेश गरडे यांनी स्नेहा ही खूप मेहनती मुलगी आहे खूप आदर्श आहे आणि तिची लावणी पाहून सगळेच चकित होतात. तिने खूप नांव कमावले आहे . तिचीही मेहनत व हुशारी पाहून आम्ही हा पुरस्कार तिला दिला असल्याचे सांगून स्नेहा नागनगौडा पाटील हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्नेहा नागनगौडा – पाटील गेल्या 4 वर्षापासून लावणी नृत्य करत असून यामध्ये तिने आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळविले आहेत. बेळगावसह महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर आदी अनेक शहरांसह गोव्यातील चोर्ला, कणकुंबी आदी गावांमध्ये स्नेहाचे आजतागायत असंख्य लावणी नृत्याचे कार्यक्रम झालेले आहेत.
लावणी नृत्याव्यतिरिक्त स्नेहा नागनगौडा हिला मॉडेलिंग, डान्स आणि एक्टिंग अर्थात अभिनय यांची आवड आहे. मॉडेलिंगमध्ये आतापर्यंत तिने उल्लेखनीय यश मिळवले आहे. लावणी आणि मॉडेलिंग याप्रमाणे स्नेहा नागनगौडा – पाटील अभिनयामध्ये देखील निपुन आहे. “जात्री बन्तू” या कन्नड लघुचित्रपटात तिने काम केले आहे. सध्या ती जैन कॉलेजमध्ये बीबीए प्रथम वर्षात शिकत आहे. स्नेहा ही खणगांव येथील प्रतिष्ठित नागरिक अनंत बाबुराव नागनगौडा – पाटील यांची सुकन्या आहे. अलीकडेच तिला कोल्हापूर येथे नॅशनल युनिटी अवॉर्ड (कलारत्न) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता “महाराष्ट्र भूषण कलेचे शिलेदार”हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.