स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामांना चालना देण्यात आली आहे. मात्र ही कामे तातडीने पूर्ण करण्याकडे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आहे. ही कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना सोयी सुविधा पुरवा अन्यथा तुमची खैर नाही, असा इशारा नगर विकास मंत्री बसवराज यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिला आहे.
शनिवारी महानगर पालिकेच्या सभागृहात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकास आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी नगर विकास मंत्री बसवराज यांनी वरील सूचना केल्या आहेत. व्यासपीठावर आमदार अनिल बेनके, मनपा आयुक्त जगदीश के एच, बुडा अध्यक्ष घोळाप्पा होसमणी, स्मार्ट सिटी चे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर आदी उपस्थित होते.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी पडून आहे. तो विकासासाठी राबविण्यात येत नाही. निधीचा योग्य प्रमाणात विनियोग करण्यात येत नसल्याने अनेकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत अधिकाऱ्यांनी कामे तातडीने पूर्ण करण्याचे सोडून ती दिरंगाई करण्यात वेळकाढूपणा केला आहे. त्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण करा अन्यथा तुमची गय केली जाणार नाही,असा इशाराही नगर विकास मंत्र्यांनी दिला आहे.
यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट बस स्थानक ट्रॉमा सेंटर जलशुद्धीकरण प्रकल्प टॉयलेट सायकल ट्रॅक रस्ते फुटतात व स्मार्ट क्लासरूम उभारण्याचे काम सुरू आहे, असे शशीधर कुरेर यांनी सांगितले. मात्र याला आडकाठी घेत नगर विकास मंत्र्यांनी कामे सुरूच ठेवू नका ती तातडीने पूर्ण करा. या कामामुळे अनेक नागरिकांना त्रास होत आहे याची काळजी घ्या आणि कामे तातडीने पूर्ण करण्याकडे लक्ष द्या असे त्यांना सांगितले.