भारतासह जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सक्तीने सामाजिक अंतर ठेवण्याबरोबरच सरकारने जाहीर केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्नाटकात आतापर्यंत 20 हून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे या पार्श्वभूमीवर बेळगाव सह राज्यातील 9 जिल्हे “लॉकडाऊन” करण्यात आले आहेत.
कर्नाटकात आढळून आलेले कोरोना बाधित रुग्ण प्रामुख्याने बेंगलोर शहर, बेंगलोर ग्रामीण, कलबुर्गी व चिकबेळ्ळापूर जिल्ह्यातील असून म्हैसूर, मडिकेरी, धारवाड आणि मंगळूर जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. कर्नाटक सरकारने एपिडिमिक डिसीज अॅक्ट 1987 च्या कलम 2, 3 व 4 आणि हैदराबाद इन्फेक्शन डिसीजेस अॅक्ट 1950 च्या कलम 16 अन्वये कर्नाटक एपिडिमिक डिसीजीस (कोव्हीड-19) रेग्युलेशन – 2020 हा कायदा तयार केला आहे.
कर्नाटक एपिडिमिक डिसीजीस (कोव्हीड-19) रेग्युलेशन – 2020 या कायद्याच्या दुसऱ्या भागात अंतर्गत बेंगलोर शहर, बेंगलोर ग्रामीण, कलबुर्गी, चिकबेळ्ळापूर, म्हैसूर, मडिकेरी, धारवाड व मंगळूर या 8 जिल्ह्यांसह कोरोनाग्रस्त महाराष्ट्र राज्यानजीक असल्याने बेळगाव अशा एकूण 9 जिल्ह्यांमध्ये सोमवार दि. 23 मार्च पासून बुधवार दि. 1 एप्रिल 2020 पर्यंत पुढील निर्बंध लागू राहणार आहेत. 1) अनावश्यक सेवा देणारी सर्व दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने, वर्कशॉप्स, गोडाऊन्स बंद राहतील, 2) मोठ्या प्रमाणात कामगार असणार या उद्योगांनी अर्धे मनुष्यबळ वापरून तसेच सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून रोटेशन पद्धतीने काम करून घ्यावे. या नियमाची अंमलबजावणी करताना कोणत्याही कामगाराला कामावरून कमी करू नये तसेच उर्वरित कामगारांना पगारी रजा दिली जावी, 3) आयटी आणि बायोटेक्नॉलॉजी युनिटने अत्यावश्यक अत्यावश्यक काम वगळता आपल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करावयास सांगावे, 4) परिवहन मंडळ आणि खाजगी कंपन्यांच्या सर्व वातानुकूलित बस सेवा बंद ठेवण्यात याव्यात, 5) उपरोक्त 9 जिल्ह्यांमध्ये कोणतीही आंतरराज्य अथवा आंतरजिल्हा वाहतूक होणार नाही.
दरम्यान, उपरोक्त 9 जिल्ह्यांमध्ये अन्नधान्य, रेशन दुकाने, दूध, भाजीपाला, किराणामाल, मटण, मासे व फळांची दुकाने खुली ठेवता येतील. मालवाहतूक करता येईल. पोलीस व अग्निशामक दल कार्यरत राहील. सरकारी कार्यालये खुली राहतील. इलेक्ट्रिसिटी व पाणीपुरवठा सुरू राहील. बँक, एटीएम व टेलिकॉम सेवा सुरू राहतील. औषधे व खाद्यपदार्थ घरपोच देणारी सेवा सुरू राहील, रेस्टॉरंट व हॉटेलमधून अन्नपदार्थ नेता येतील, कृषी बागायत संबंधित दुकाने खुली राहतील, सरकारी अथवा स्थानिक प्रशासनाची कॅन्टींन्स खुली राहतील.