शहरातील शॉपिंग मॉल्स पुन्हा सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र या ठिकाणी फक्त जीवनावश्यक वस्तू आणि धान्याची विक्री केली जाणार आहे.
राज्यात धोकादायक कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सरकारने शॉपिंग मॉल 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते तरीदेखील शहरातील बिग बाजार रिलायन्स डी-मार्ट सारखे मॉल सुरू होते याबाबत प्रशासनाकडे तक्रारी आल्यानंतर गेल्या सोमवारी सर्व मॉल बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला होता त्यामुळे त्यादिवशी सायंकाळी 6 नंतर सर्व मॉल मंगळवार दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. तथापि दुपारनंतर मात्र फक्त जीवनावश्यक वस्तू व धान्य विक्री करण्याची परवानगी सर्व शॉपिंग मॉल्सना देण्यात आली आहे.
यामुळे काल मंगळवार दुपारनंतर बिग बझार, रिलायन्स, डी-मार्ट आदी मॉल्समध्ये ग्राहकांची तुरळक वर्दळ सुरू झाली. दरम्यान मॉल्समध्ये फक्त जीवनावश्यक वस्तू व धांन्याचीच विक्री केली जावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. लोकांनी देखील कुठेही गर्दी करणे टाळावे, असे आवाहन महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी केले आहे.