Sunday, December 22, 2024

/

चपला शिवतं आयुष्याला टाके घालणाऱ्या “शांता कांबळे

 belgaum

ती थकत नाही, ती रडत नाही, कोणाच्या टीकेची पर्वा करत नाही कोण काय म्हणते याकडे लक्ष देण्यासाठी तिच्याकडे वेळ नाही, कारण तिला भ्रांत आहे ती दोन वेळच्या जेवणाची आणि कुटुंबातील प्रत्येकाचे पोट भरण्याची, त्यामुळेच उन्हाळा असो पावसाळा असो ती आपल्या छोट्याशा खोक्यात बसून चप्पल शिवत असते. जणूकांही चपला शिवताना आपल्या फाटलेल्या आयुष्यालाही टाके घालत असते, ती आहे “शांता कांबळे “.

सहसा जे काम महिला करत नाही असे चप्पल शिवण्याचे काम शांता कांबळे करतात. ती कुशलतेने चप्पल शिवते, तुटलेला धागां धागां जोडणे ही जणू तिची आयुष्याची मिळत असते, खरंतर चर्मोद्योग अंतर्गत चप्पल शिवण्याची काम करताना महिला सहसा आढळून येत नाहीत. शांताबाई कांबळे मात्र याला अपवाद आहेत. समादेवी गल्ली येथे आपल्या दुकानाचा खोक्यांमध्ये त्या निवांतपणे चप्पल शिवण्याची काम करताना दृष्टीस पडतात.

शांताबाई या मूळच्या दड्डी गावच्या रहिवासी असून लग्नानंतर त्या बेळगावला आल्या. चप्पल शिलाई हा कांबळे घराण्याचा पूर्वापार व्यवसाय आहे. प्रारंभी खरेतर शांताबाई यांना या कामाची माहिती नव्हती तसेच हे काम शिकण्याची सक्ती ही कुणी केली नव्हती. तथापि पतीचे काम बघून उत्सुकतेपोटी त्यांनी चप्पल शिलाईचे काम आत्मसात केले त्याची परिणीती ही आहे की आज समादेवी गल्ली येथे त्या निसंकोचपणे स्वतःचे चप्पल दुकान खोके सांभाळतात.

भररस्त्यावर एक बाई चप्पल शिवतं बसते हे पाहून प्रारंभी लोकांची कुजबुज होणे हे सर्वसामान्य आहे. यासंदर्भात विचारणा केल्यास “बघणारे माझ्या व कुटुंबाच्या पोटाची चिंता करत नाही तर मी कशाला त्यांचा विचार कर” असा रोखठोक प्रतिप्रश्न त्या करतात. पती व मुलगा यांना आपली मदत होते हे सर्वात महत्त्वाचे असा एकूण त्यांचा खाक्या आहे. समादेवी गल्लीत दैनंदिन व्यवहार आणि कामे करणाऱ्या लोकांना माहित आहे की शांताबाई कांबळे निवांतपणे आपल्या चप्पल शिलाईच्या कामात व्यस्त असतात.

सचोटीने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना मरण नसते. काही वर्षापूर्वी खोकी हटवण्याचे शासनाचे आडमुठे धोरण अनेकांचे रोजगार काढून घेणारे ठरले शांताबाई देखील त्याला अपवाद नव्हत्या. खोकी हटाव मोहिमेत त्यांचेही खोके गेले. तेंव्हा सुरुवातीला उन्हाचे चटके सोसत काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली. तथापि खचून न जाता स्वकर्तृत्वावर आणि हितचिंतकांच्या सहकार्याने त्यांनी आपले खोके परत मिळवले. अशा या शांताबाई कांबळे आज समादेवी गल्ली येथील श्री समादेवी मंदिरानजीक आपल्या चप्पल दुकानात सन्मानाने काम करताना पहावयास मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.