कोरोना विषाणू बाधित यांची वाढती संख्या आणि देशव्यापी लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता सातवीच्या बोर्डाच्या परीक्षेचेसह अन्य कांही परीक्षा आता येत्या सोमवार दि. 20 एप्रिल 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
राज्याच्या सार्वजनिक शिक्षण खात्याच्या आयुक्ताने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपरोक्त माहिती दिली आहे. प्रारंभी कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता सातवीची बोर्डाची परीक्षा मंगळवार 31 मार्च 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. तथापि आता देशासह कर्नाटकातील कोरोना विषाणू बाधितांची वाढती संख्या तसेच 14 एप्रिल पर्यंत पंतप्रधानांनी जाहीर केलेला देशव्यापी लॉक डाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन सदर परीक्षा आणखी लांबणीवर टाकण्यात आली आहे.
आता राज्यातील इयत्ता सातवीच्या बोर्डाच्या परीक्षेसह एसएसएलसी परीक्षा, आरटीआय प्रवेश प्रक्रिया आणि नूतन शाळा प्रवेश याबाबतचा निर्णय येत्या सोमवार दि. 20 एप्रिल 2020 नंतर घेतला जाणार असल्याचे सार्वजनिक शिक्षण खात्याच्या आयुक्ताने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.