एकीकडे भाजपने आगामी बेळगाव महापालिका निवडणूक पक्ष चिन्हावर लढविण्याची घोषणा केली असताना दुसरीकडे काँग्रेसने मात्र या बाबतीत सावध भूमिका घेतली आहे. महापालिका निवडणूक पक्ष चिन्हावर लढवायची की नाही याबाबत स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे.
प्रदेश कार्याध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आमदार सतीश जारकीहोळी पहिल्यांदाच आज शुक्रवारी बेळगाव दौऱ्यावर आले आहेत. यानिमित्त आरटीओ सर्कल येथील काँग्रेस भवन मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश कार्याध्यक्ष आम. सतीश जारकीहोळी बोलत होते. भारतीय जनता पक्षाने अलीकडेच आगामी महापालिका निवडणूक पक्ष चिन्हावर घडविण्याचे जाहीर केले आहे. याबाबतीत काँग्रेस पक्ष कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना आमदार जारकीहोळी म्हणाले की, यासंदर्भात पक्षाने अद्यापर्यंत तरी निर्णय घेतलेला नाही. तथापि लवकरच स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून बेळगाव महापालिका निवडणूक पक्ष चिन्हावर लढवायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले.
राज्यातील काँग्रेस पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही. डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या असे काँग्रेस पक्षात दोन गट असले तरी त्यांच्यामध्ये मतैक्य आहे. डी. के. शिवकुमार हे प्रदेशाध्यक्ष आहेत तर सिद्धरामय्या हे एक प्रभावी नेते आहेत. या उभयतांचे वेगवेगळे गट असले तरी पक्षाच्या बाबतीत त्यांच्यामध्ये एक मत असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
काँग्रेस हायकमांडने कर्नाटकात माझ्यासह तीन प्रदेश कार्याध्यक्ष निवडले आहेत. दलित समाजाला कार्याध्यक्षपद मिळावे अशी मागणी होती. परंतु हाय कमांडचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो. तथापि आम्ही सर्वांना विश्वासात घेऊनच काम करणार आहोत. घर म्हणजे भांडण होणारच निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी गटबाजी होत असते. खूप दिवसापासून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष निवडीबाबत चर्चा होत होती. अखेर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आमची निवड केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. येत्या 3 वर्षानंतर विधान सभा निवडणुका लागणार असल्यामुळे आतापासूनच आम्ही पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तयारीला लागणार आहोत. गोकाकसह अन्य तीन मतदारसंघात काँग्रेस पक्ष कांहीसा कमकुवत झाला आहे, त्याला त्याठिकाणी पुन्हा बलाढ्य करण्यावर आमचा अधिक भर राहील, असेही काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात आपण लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान आज सकाळी काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांचे बेळगावात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांतर्फे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. आरटीओ सर्कल येथील काँग्रेस भवनमध्ये दुपारी आयोजित युवा कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्याध्यक्षांनी मार्गदर्शन केले. प्रदेश कार्याध्यक्ष आम. सतीश जारकीहोळी हे बेळगाव जिल्ह्याचा तीन दिवसांचा दौरा करणार आहेत.