राज्यासह देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना आतापर्यंत बेळगाव जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. हे चित्र असेच कायम ठेवून कोरोना विषाणूचा धोका टाळावयाचा असेल तर नागरिकांनी विशेष करून होम कोरोंटाइन असलेल्या रुग्णांनी शक्यतो घरातच राहणे अत्यावश्यक आहे. हा संकेत जर नागरिकांनी काटेकोरपणे पाळला तरच भविष्यात “कोरोना”च्या स्वरुपातील मृत्यूच्या कराल जबड्यातून सुरक्षित राहिलेल्या देशातील मोजक्या शहरांपैकी एक शहर होण्याचा सन्मान बेळगावला लाभणार आहे.
चीनमधून जगभरात संक्रमित झालेल्या कोविड -19 अर्थात कोरोना विषाणूमुळे लाखो लोक आजतागायत बाधित झाले असून हजारो नागरिकांचा या विषाणूने बळी घेतला आहे. तसेच सध्या शेकडो नागरिक मृत्युपंथाला लागले आहेत. कोरोना संसर्ग च्या बाबतीत केलेले दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा याची किंमत आज इटलीसारख्या प्रगत देशाला मोजावी लागत आहे. अतिशय संसर्गजन्य अशा या जीवघेण्या विषाणूपासून सुरक्षित राहायचे असेल थोडक्यात आपला जीव वाचवायचा असेल तर भअन्य पर्याय बरोबरच सर्वात महत्वाचा पर्याय म्हणजे स्वतःला घरात कैद करून घेणे हा आहे. “महाभयंकर कोरोना विषाणूच्या तावडीतून आपला जीव वाचवायचा असेल तर घराबाहेर पडू नका घरांमध्येच राहा”, असा सल्ला कोरोना समोर हात टेकलेल्या जगभरातील वैज्ञानिक आणि तज्ञांनी पोटतिडकीने दिला आहे. जगातील प्रत्येक प्रगत देशांमधील प्रयोगशाळांमध्ये संशोधक कोरोना विषाणुवरील लस अर्थातच औषध शोधण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. तथापि अद्यापपर्यंत कोणालाही त्यामध्ये यश आलेले नाही.
यासर्व पार्श्वभूमीवर बेळगावचा विचार करता आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या जिल्ह्यात अद्यापपर्यंत तरी एकही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. कोरोना विषाणूंवर मात करायची असेल तर सर्वांनी शक्यतो घरातच राहणे हा एकमेव पर्याय असून होमकोरंटाईन अर्थात अलग ठेवलेल्या रुग्णांनी तर घराबाहेर पडूच नये. आरोग्य खात्याकडून कोरंटाईन रुग्णांना शिक्के मारण्यात आले आहेत. हे रुग्ण घराबाहेर पडणार नाहीत किंवा सर्वसामान्यत मिसळणार नाहीत, याची काळजी नागरिकांनी घ्यावयाची आहे.ज्या गल्लीत ज्या भागांत होम कोरोंटाइन आहेत त्यांच्यावर नजर ठेवून कुणीही त्यांच्या संपर्कात येऊ नये याची काळजी घेतली नक्कीच कोरोनो मुक्त बेळगाव होऊ शकेल.
कोरोंटाइन असलेल्या स्वतः त्या रुग्णानेही याबाबत खबरदारी घ्यावयास हवी. वैयक्तिक स्वच्छतेसह सामाजिक अंतर ठेवणे हे गरजेचे आहेच, परंतु त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे हे आहे की आपण सर्वांनी विशेष करून कोरंटाईन असलेल्या रुग्णांनी घराबाहेर पडू नये. जर एखादा कोरंटाईन रुग्णास सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास नागरिकांनी त्वरित 100 नंबर अथवा 104 क्रमांकावर संपर्क साधून त्याबाबत माहिती द्यावी.
बेळगाव जिल्ह्यात आज पर्यंत 369 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. तसेच 248 जणांचे विलगीकरण (होम कोरोंटाइन)करण्यात आले आहे. ज्या नागरिकांचे विलगीकरण झालेले आहे. तसेच उपचारा अंती जे रुग्ण बरे झाले आहेत त्यांनीदेखील बेसावध न राहता आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.सध्या प्रशासनाने बेळगाव जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत या लोक डाऊन मुळे जिल्ह्यातील नागरिक बाहेर जाऊ शकत नाहीत आणि बाहेरील व्यक्ती जिल्ह्यात येऊ शकणार नाही. त्यामुळे हा कालावधी बेळगाववासियांना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असून प्रशासनाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याबरोबरच आपण जर विनाकारण घराबाहेर पडणे बंद केले तर निश्चितपणे कोरोना प्रादुर्भावाला आळा बसू शकतो हे निश्चित.
कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. यासाठी सर्वानी सजग राहून एकमेकांची काळजी घेण्याबरोबरच करोना संदर्भातील खबरदारीच्या उपायांबद्दल प्रत्येकाला जागरूक केले पाहिजे. लाॅक डाऊन होऊन अजून पुरता आठवडा झाला नाही. त्यामुळे इतक्यात कोणत्याही निष्कर्षापर्यंत आपण येऊ शकत नाही. कोणतीही शक्यता नाकारता येत नाही, बेळगावमध्ये अद्याप एकही रुग्ण सापडला नाही याचे समाधान आपण सर्वांनाच आहे. पण ते चिरंतन राहण्यासाठी डॉक्टरांनी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचना आणि नियमांचे पालन करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. विक्रमाच्या यादीमध्ये बेळगावचा समावेश व्हायचा असेल तर सध्या दक्षता आणि खबरदारी यावर आपला भर राहील याचे भान आपण बाळगू यात का?