रविवारी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केल्यामुळे विविध संघटनांनी त्याला पाठिंबा दिला असून जनतेत देखील जागृती निर्माण झाली आहे.रविवारी दुकाने बंद राहणार असल्यामुळे शनिवारी संध्याकाळी मटण,चिकन दुकान,दूध डेअरी,वाइन शॉप आणि पेट्रोल पंपावर लोकांनी गर्दी केली होती.
मटण आणि चिकन दुकाना समोर तर लोकांची झुंबड उडाली होती.काही ठिकाणी तर ग्राहकांना आत घेतले जात होते.आतील ग्राहक बाहेर आल्यावर बाहेरील ग्राहकांना आत घेतले जात असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. अनेक मटण शॉप समोर रांका लागल्या होत्या एरव्ही सायंकाळी सात पर्यंत सुरू असणारी सर्वच दुकान रात्री 9 पर्यंत चालू होती.
संपूर्ण दिवस घरात बसून काढायचा असल्यामुळे घरातच मटण,चिकनच्या विविध डिशवर ताव मारण्याचे आयोजन लोकांनी केले असल्याचे सांगितले.उद्या मद्य दुकाने बंद राहणार असल्यामुळे तळीरामानी देखील सकाळपासूनच दोन दिवसांचा दारूचा साठा घेण्यासाठी गर्दी केली होती.दूध घेण्यासाठी देखील डेअरी आणि दूध कंपन्यांच्या दुकानात गर्दी केली होती.
शहरातील बाजारपेठेत देखील लोकांनी खरेदीसाठी आणि औषधांच्या दुकानात देखील औषधे घेण्यासाठी गर्दी केली होती.पेट्रोल पंपावर देखील पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.