कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी बेळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीटचा दर आता 50 रुपये करण्यात आला आहे.
महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील कांही भागात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे राज्य सरकारतर्फे सर्व ती खबरदारी घेतली जात आहे. नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने देखील रेल्वे स्थानकावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी उपाय म्हणून बेळगाव, हुबळी व बेळ्ळारी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढविण्यात आल्याची घोषणा बुधवारी केली. हुबळी रेल्वे विभागाच्या या घोषणेनुसार बेळगावसह अन्य दोन रेल्वेस्थानकांवर येत्या 31 मार्च 2020 पर्यंत प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर आता 50 रुपये असणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता प्लॅटफॉर्म तिकिटासाठी 5 ऐवजी 50 रुपये मोजावे लागणार आहेत.
नैऋत्य रेल्वेच्या विभागाने गेल्या मंगळवारी आपल्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकिटांचा दर वाढविला होता. त्यानंतर आता काल बुधवारी हुबळी विभागाने प्लॅटफॉर्मवरील अनावश्यक गर्दीला आळा घालण्यासाठी तिकिटाचा दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आज गुरुवारपासून येत्या 31 मार्चपर्यंत उपरोक्त तीनही रेल्वेस्थानकावर हा नवा प्लॅटफॉर्म तिकीट दर लागू असणार आहेत.