वाहनांच्या बाबतीत कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत असले तरी खुद्द सरकारी वाहनांकडूनच या कायद्याची पायमल्ली होत असल्याचे आज बुधवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पहावयास मिळाले.
कायद्यानुसार नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याची त्वरित प्रादेशिक परिवहन खात्याकडे नोंद करून रजिस्ट्रर नंबर अर्थात वाहनाची नंबर प्लेट संबंधित वाहनावर सक्तीने लावावी लागते. तथापि आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बेळगाव जिल्हा पंचायतीच्या मुख्य योजना अधिकाऱ्यांची कार गाडी नंबर प्लेटविना दिमाखात पार्किंग लॉटमध्ये उभी असल्याचे पहावयास मिळाले.
सर्वसामान्य वाहनचालकांना या – ना त्या कारणावरून वेठीस धरणार्या प्रादेशिक परिवहन खाते आणि रहदारी पोलीस खात्याचे या प्रकाराकडे मात्र सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल नागरिकात सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच हा दुजाभाव केंव्हा थांबणार? असा सवालही केला जात आहे.