सुवर्णसौध हालगा येथील बाजारवाट रस्ता दुरुस्तीबाबत येत्या 10 दिवसात ठोस निर्णय घ्यावा अन्यथा सरकार विरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा हालगा ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
हालगा ग्रामस्थांच्यावतीने ॲड. आण्णासाहेब घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन आज मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. हालगा (ता. जि. बेळगाव) येथील बेळगावला आणि शेतीला जाण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या बाजारवाट रोड या रस्त्याची गेल्या काही वर्षापासून फार दुर्दशा झाली आहे. सदर रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडून गेल्यामुळे या ठिकाणी लहान – मोठे खड्डे पडले आहेत. परिणामी या रस्त्यावरून ये-जा करताना शेतकरी, कामगार, विद्यार्थी आदी सर्वांनाच त्रास होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे याठिकाणी वरचेवर किरकोळ अपघात घडत असतात.
गेल्या दोन वर्षांपासून वेळोवेळी या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करुन देखील अद्याप त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तेंव्हा आता जर येत्या 10 दिवसात बाजारवाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास सरकारविरुद्ध हालगा ग्रामस्थांतर्फे उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी अॅड. मारुती कामानाचे ॲड. एम. एस. नंदी,अॅड. सदानंद ओसापाचे, बी.पी. जवेणी, अॅड. शरद देसाई, अॅड. संजू कामत, अॅड. सुभाष, मोदगेकर, अॅड. चंदू काकडे, अॅड. व्ही. एस. करजगी, अॅड. के. एस. नाईक, अॅड. रवी बोगार, प्रकाश काणोजी, मनोहर काणोजी, पुंडलिक हनुमंताचे, मारुती भेकणे, गीता भेकणे, राजश्री पाटील, जयश्री पाटील, गंगापन्ना पाटील, गौरवा पाटील, मारुती घोरपडे, भाऊ देसाई आदींसह हालगा ग्रामस्थ उपस्थित होते.