देशातील लाॅक डाऊनच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या रहमान फाउंडेशनच्या बेळगाव शाखेतर्फे शहरातील रोजंदारीवर काम करणाऱ्या तसेच गरीब गरजू कुटुंबांना कोणताही भेदभाव न करता जीवनावश्यक वस्तूंचे “रेशन किट”चा मोफत पुरवठा करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे.
रहमान फाऊंडेशनचे बेळगाव शाखेचे अध्यक्ष मुहंमद हनीफ सिद्दकी यांनीही ही माहिती बेळगाव लाईव्ह ला दिली. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या तसेच गोरगरिबांच्या पोटापाण्याचे मोठे हाल होत आहेत. याची दखल घेऊन रहमान फाउंडेशनतर्फे अशा लोकांना भाषा, जाती-धर्म आदी कोणताही भेदभाव न करता जीवनावश्यक वस्तूंचे रेशन किट मोफत वितरण केले जात आहे. सुमारे 1000 रुपये किंमतीच्या या रेशन किटमध्ये 10 किलो तांदुळ, 5 किलो आटा, 2 किलो साखर, अर्धा किलो चहा पावडर, एक किलो साधी डाळ, एक किलो मुगडाळ, एक पाकीट खाद्यतेल, एक पाकीट मीठ, टर्मरिक पावडर 100 ग्रॅम, मिक्स रेड चिली 250 ग्रॅम आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणार आहे.
बेळगाव शहरातील सदाशिनगर, आंबेडकरनगर, अस्मा कॉलनी, सह्याद्रीनगर, कुमारस्वामी लेआउट, वैभवनगर, यमुनापूर, काकती आदी परिसरातील गरीब गरजू लोकांना रेहमान फाउंडेशनतर्फे संपूर्ण चौकशी अंती उपरोक्त रेशन किट दिले जाणार आहे. यासाठी रहमान फाऊंडेशनचे सदस्य आणि कार्यकर्ते संबंधित परिसरातील मोलमजुरी करणारे लोक, रोजंदारीवरील कामगार तसेच अन्य गोरगरिबांच्या घरोघरी जाऊन माहिती गोळा करत असल्याचे मुहंमद सिद्दीकी यांनी सांगितले.
रहमान फाउंडेशन ही राष्ट्रीय पातळीवरील नोंदणीकृत सामाजिक संस्था असून बेळगाव जिल्ह्यात बेळगावसह गोकाक, चिकोडी, बैलहोंगल व सौंदत्ती येथे या संस्थेच्या शाखा आहेत. दरम्यान सदर फाउंडेशनतर्फे उदात्त हेतूने राबविण्यात येत असलेल्या उपरोक्त रेशन किट वितरण उपक्रमास सहाय्य करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्ती व संघसंस्थांनी बँक ऑफ बरोडा, एसीबी नं.- 05230100011126, आयएफएससी कोड- बीएआरबीओबीईएलजीएयु याठिकाणी अथवा 9448635126, 9845842977 किंवा 9590289120 या क्रमांकावर संपर्क साधून अर्थसहाय्य करावे, असे आवाहन रहमान फाउंडेशनचे अध्यक्ष मुहंम्मद हनीफ सिद्दकी यांनी केले आहे.