निवडणूक काळात घरोघरी जाऊन निर्लज्जपणे मते मागणाऱ्या बेळगावच्या राजकीय नेत्यांचे मंगळवारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बोलावलेल्या विशेष बैठकीस गैरहजर असणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. यावरून या नेत्यांना जनतेची किती काळजी आहे हे दिसून येते, अशी संतप्त प्रतिक्रिया कर्नाटक राज्य रयत संघाचे पदाधिकारी प्रकाश नाईक यांनी “बेळगाव लाईव्ह” समोर व्यक्त केली.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत मंगळवारी जिल्हा पंचायत सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीस बेळगावातील एकही राजकीय नेता अर्थात लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता. लग्नसमारंभात सारख्या कार्यक्रमावर बंदी असतानाही ही मंडळी पाहुणचार झोडायला जातात, तथापि समाज हिताच्या दृष्टिकोनातून बोलाविलेल्या करण्यासंदर्भातील बैठकीला मात्र उपस्थित राहण्याच्या या लोकांकडे वेळ नाही. यावरून या नेतेमंडळींना समाजाबद्दल, लोकांबद्दल आणि देशाबद्दल किती काळजी आहे हे लक्षात येते, असे प्रकाश नाईक पुढे म्हणाले.
केंद्रातील राजकीय नेते मंडळींसह संपूर्ण जगभरातील नेते प्राणघातक कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी झटत असताना बेळगावचे लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. निवडणुकीच्या काळात मते मिळवण्यासाठी निर्लज्जा सारखे घरोघरी फिरणार्या या नेत्यांनी खरेतर कोरोनासंदर्भातील मोहिमेचे नेतृत्व करावयास हवे, त्यांनी घरोघरी जाऊन लोकांना कोरोनाबाबत जागृत करून मार्गदर्शन केले पाहिजे. तथापि सध्या तरी असे घडताना दिसत नाही. सध्याचे बेळगावच्या नेतेमंडळीचे वर्तन पाहता हे लोक कोरोनाला घाबरत नाहीत, तर कोरोना विषाणूच घाबरून यांच्याजवळ येत नाही की काय? असे वाटू लागले आहे, कसे नाईक उपरोधाने म्हणाले.
अद्यापही वेळ गेलेली नाही बेळगावच्या लोकप्रतिनिधींनी स्वतःला सुधारावे आणि लोकात मिसळुन त्यांच्यात कोरोनाबाबत जागृती निर्माण करावी, असे सांगून प्रकाश नाईक यांनी शहरातील स्मार्ट सिटी योजनेच्या कामावर जोरदार टीका केली. स्मार्ट सिटीच्या लोकांनी बेळगाव शहराची पुरती वाट लावली आहे. या योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे बऱ्याच ठिकाणी अर्धवट सोडण्यात आलेली आहेत. विकास कामांमध्ये कोणतेही नियोजन दिसत नाही. सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी अपघात घडत आहेत. धुळीमुळे नागरिकांना विशेष करून वयस्क आणि लहान मुलांना कफ होऊन ताप येत आहे. सध्या परिस्थिती अशी आहे की ही कफ आणि तापाची लक्षणे सर्वसामान्य आहेत की कोरोनाची आहेत? असा प्रश्न पडल्याने नागरिक घाबरून जात आहेत. तेंव्हा स्मार्ट सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही प्रकाश नाईक यांनी केली. याप्रसंगी नाईक यांच्यासमवेत कर्नाटक राज्य रयत संघाचे अध्यक्ष जुनाप्पा पुजारी हेदेखील उपस्थित होते.